पिंपरी : तीन दिवसांपूर्वी निगडी येथे ऑप्टिकल फायबरच्या ‘डक्ट’मध्ये उतरलेल्या तीन कामगारांचा मृत्यू झाला. या कामाशी पिंपरी-चिंचवड महापालिकेचा संबंध नसताना एका सामाजिक कार्यकर्त्याने समाजमाध्यमावर चित्रफीत प्रसारित करून महापालिकेची बदनामी केल्याचा आरोप प्रशासनाने केला आहे. कार्यकर्त्यावर कारवाई करण्यासाठी अधिकार्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. महापालिकेचे मुख्य अभियंता संजय कुलकर्णी यांनी निगडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
भारत संचार निगम लिमिटेडने (बीएसएनएल) ऑप्टिकल फायबरसाठी बीएसएनएलचे शहरात ठिकठिकाणी दहा बाय दहाच्या चौकोनी आकाराचे डक्ट केले आहेत. बीएसएनएलच्या आकुर्डी कार्यालयातील ठेकेदार आणि तीन कंत्राटी कामगार शुक्रवारी दुपारी ऑप्टिकल फायबरच्या देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी प्राधिकरण येथे गेले हाेते. तीन फूट खोल पाणी असलेल्या डक्टमध्ये उतरल्याने लखन अश्रूबा धावरे (वय ३५), दत्तात्रय विजयकुमार व्हनाळे (वय ३८, दोघे रा. चिंचवड, मूळ धाराशिव), साहेबराव संभाजी गीरशेटे (वय ३५, रा. बिजलीनगर, चिंचवड, मूळ चंद्रपूर) या तिघांचा मृत्यू झाला. श्वास गुदमरल्याने मृत्यू झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. शवविच्छेदनाचा अहवाल आला नाही. त्यामुळे मृत्यूचे नेमके कारण समजू शकले नाही. दरम्यान हे काम बीएसएनएलचे आहे. त्याचा महापालिकेशी काही संबंध नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले होते.
या कामाशी पिंपरी-चिंचवड महापालिकेचा कोणताही संबध नसताना तसेच कोणतीही माहिती न घेता, सामाजिक कार्यकर्त्याने समाजमाध्यमांवर पिंपरी-चिंचवड महापालिकेवर आरोप करून चित्रफीत प्रसारित केली. पिंपरी-चिंचवड महापालिकेची नाहक बदनामी झाली. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी अशी तक्रार महापालिका अधिकार्यांनी निगडी पोलिसांकडे दिली आहे.
महापालिकेचे मुख्य अभियंता संजय कुलकर्णी म्हणाले, ‘निगडीतील ‘डक्ट’ महापालिकेचे नव्हते. महापालिकेचा काहीही संबंध नाही. सामाजिक कार्यकर्त्याने कोणतीही माहिती न घेता महापालिकेची बदनामी केली. त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी निगडी पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला आहे’.
निगडी ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बानसोडे म्हणाले, ‘याप्रकरणी आकस्मात मृत्यूची नाेंद केली आहे. बीएसएनएलचे अधिकारी, कर्मचाऱ्यांचे जबाब घेण्यात येत आहेत. जबाब घेतल्यानंतर गुन्हा दाखल करण्याची कारवाई केली जाईल. शवविच्छेदनाचा अहवाल आला नाही. त्यामुळे मृत्यूचे नेमके कारण समजू शकले नाही.’