पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेने शाश्वत, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक शहरी वाहतूक व्यवस्थेसाठी राबवलेल्या नावीन्यपूर्ण उपक्रमांची दखल राष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली आहे. या उपक्रमांसाठी महापालिकेला केंद्र शासनाच्या गृहनिर्माण व शहरी कार्य मंत्रालयामार्फत ‘शहरी वाहतूक उत्कृष्टता पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
केंद्रीय गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्री मनोहर लाल खट्टर यांच्या हस्ते महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, सहशहर अभियंता बापू गायकवाड, कार्यकारी अभियंता सुनील पवार यांनी हा सन्मान स्वीकारला. ‘सर्वाधिक नावीन्यपूर्ण वित्तीय यंत्रणा असलेले शहर’ या श्रेणीत हा पुरस्कार महापालिकेला प्राप्त झाला आहे.
महापालिकेने गैरमोटारीकृत वाहतुकीसाठी काम सुरू केले आहे. हरित कर्जरोख्याद्वारे २०० कोटी रुपयांचा निधी उभारण्यात आला आहे. या निधीतून हरित सेतू प्रकल्प आणि टेल्को रोड पुनर्विकास प्रकल्प राबविण्यात येत आहेत. नागरिकांना सुरक्षित व सावली असलेले पादचारी मार्ग, सुरक्षित सायकल मार्ग, सुरक्षित शाळा क्षेत्रे, सायकलसाठी वाहनतळ, वृक्षलागवड हा या उपक्रमाचा उद्देश आहे. हरित सेतू उपक्रमांतर्गत निगडी प्राधिकरण परिसरातील १७ किलोमीटर रस्त्यांवर विकासकामे सुरू करण्यात आली आहेत. हरित सेतू अंतर्गत विकसित झालेले रस्ते मुलांसाठी आणि महिलांसाठी अधिक सुरक्षित आहे. या रस्त्यांवर सुरक्षितपणे चालणे, थांबणे आणि सायकल चालवणे आता अधिक आनंददायी व सोयीचे झाल्याचा दावा महापालिकेने केला आहे.
या उपक्रमांची दखल घेऊन महापालिकेला केंद्र शासनाच्या वतीने ‘शहरी वाहतूक उत्कृष्टता पुरस्कार’ देऊन गौरवण्यात आले आहे. या पुरस्कारामुळे पिंपरी-चिंचवड शहर देशभरात शाश्वत वाहतूक आणि नावीन्यपूर्ण आर्थिक नियोजनाचे आदर्श उदाहरण ठरले आहे. महापालिकेच्या प्रयत्नांमुळे चालणे, सायकल वापरणे आणि सार्वजनिक वाहतुकीचा अवलंब वाढत असल्याचे कार्यकारी अभियंता सुनील पवार यांनी सांगितले.
महापालिकेने शाश्वत शहरी वाहतुकीसाठी वित्तीय स्वावलंबनाचा अभिनव मार्ग अवलंबला आहे. हरित कर्जरोख्यामुळे प्रकल्पांसाठी आवश्यक निधी वेळेवर उपलब्ध झाला. त्यामुळे विकासाच्या गतीत मोठी वाढ झाली. – विजयकुमार खोराटे, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका
शहरातील जवळच्या अंतरावरील प्रवास पायी, सायकलने आणि दूर अंतरावरील सार्वजनिक वाहतुकीने करणे सन २०३६ पर्यंत शक्य होईल. त्यासाठी हरित सेतू आणि टेल्को रोड प्रकल्प हे महत्त्वाचे टप्पे आहेत. – बापूसाहेब गायकवाड, सहशहर अभियंता, पिंपरी-चिंचवड महापालिका
