पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता, चिंतनशीलता, सहकार्य आणि संवाद कौशल्ये विकसित करणे, त्यांचे व्यक्तिमत्त्व घडणीवर भर देण्यासाठी ‘आफ्टर-स्कूल मॉडेल’च्या अंमलबजावणीस सुरुवात केली आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानासोबतच कला, कोडिंग, तंत्रज्ञान, आर्थिक साक्षरता यांसारख्या जीवनावश्यक कौशल्यांचे प्रशिक्षण मिळणार असल्याचे शिक्षण विभागाने सांगितले.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या १०५ प्राथमिक आणि १८ माध्यमिक शाळा असून यामध्ये ५७ हजार ५६० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. महापालिका शिक्षण विभागातर्फे ‘दि अप्रेंटिस प्रोजेक्ट’ (टॅप) अंतर्गत ‘आफ्टर-स्कूल मॉडेल’ हा उपक्रम सर्व शाळांमध्ये राबविण्यात येणार आहे. त्याअंतर्गत विद्यार्थ्यांना कला, कोडिंग, तंत्रज्ञान, आर्थिक साक्षरता यांसारख्या जीवनावश्यक कौशल्यांचे प्रशिक्षण मिळणार आहे. भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी त्यांना तयार केले जाणार आहे. त्यासाठी महापालिकेच्या शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षकांना भोसरीतील अंकुशराव लांडगे नाट्यगृहात प्रशिक्षण देण्यात आले.
शिक्षकांना उपक्रमाची उद्दिष्टे, कार्यपद्धती, अभ्यासक्रम, विद्यार्थी व शिक्षक नोंदणी प्रक्रिया, मुख्याध्यापक आणि नोडल अधिकाऱ्यांची जबाबदारी याबाबत मार्गदर्शन केले. हा उपक्रम सार्वजनिक शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण सुनिश्चित करण्याचे एक मोठे पाऊल आहे. शिक्षकांचे प्रशिक्षण आणि ‘आफ्टर-स्कूल’ अनुभव विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासास चालना देईल, असा विश्वास शिक्षण विभागाचे सहायक आयुक्त किरणकुमार मोरे यांनी व्यक्त केला.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पुस्तकी ज्ञानासोबतच कला, कोडिंग, तंत्रज्ञान आणि आर्थिक साक्षरता यांसारखी कौशल्ये अत्यावश्यक आहेत. ‘दि अप्रेंटिस प्रोजेक्ट’ उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व आणि आत्मविश्वास वाढेल, असे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील यांनी सांगितले.
उपक्रम कसा चालतो?
शाळेनंतरची शाळा हा उपक्रम आहे. विद्यार्थी स्वतःच्या आवडीचा अभ्यासक्रम निवडतात. आठवड्यातून एकदा व्हाट्सअप चॅटबॉटद्वारे एक उपक्रम पाठवला जातो. विद्यार्थ्यांना उपक्रम पूर्ण करण्यासाठी एका आठवड्याचा कालावधी दिला जातो. प्रत्येक उपक्रमाच्या शेवटी विद्यार्थी चित्र, चित्रफीत, प्रकल्प निर्मिती करतात. त्यांच्या शिक्षणाची आणि प्रगतीची पडताळणी करणाऱ्या प्रश्न मंजुषेची उत्तरे देतात.
विद्यार्थ्यांनी का सहभागी व्हावे?
या उपक्रमातून स्वतःच्या आवडी व कौशल्याचा शोध घेता येतो. आत्मविश्वास व नवी कौशल्ये विकसित होतात. मजेदार, संवादात्मक उपक्रम करता येतात. हुशार, स्वावलंबी व भविष्याकरिता सज्ज होता येते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन शिक्षण विभागाने केले.
उपक्रमाची वैशिष्ट्ये
विद्यार्थ्यांना फक्त परीक्षांसाठीच नव्हे तर त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या घडणीवर भर
रेखाटन, चित्रकला आणि सर्जनशील हस्तकला शिकविणार
रंग, डिझाइनद्वारे भावना व्यक्त करणे
विविध कला प्रकारांचा सिद्धांत समजून घेणे
जिज्ञासा आणि समस्या सोडवण्यासाठी कौशल्ये विकसित करणे
रोमांचक विज्ञान प्रयोग
खेळ, कथा, अनिमेशन तयार करणे
सोप्या साधनांद्वारे मूलभूत संगणक प्रोग्रॅमिंग शिकविणार
पैशांचे महत्व आणि स्मार्ट बचत सवयी