पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील शंभरहून अधिक सदनिका असलेल्या गृहनिर्माण सोसायट्यांना सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) कार्यान्वित करण्याबाबत तीन वेळा नोटिसा बजावूनही त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या ५० सोसायट्यांवर पहिल्या टप्प्यात महापालिकेने सोमवारपासून कारवाई सुरू केली आहे. पहिल्या दिवशी, सोमवारी ‘क’, ‘इ’ आणि ‘फ’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील तीन सोसायट्यांचे नळजोड बंद करण्यात आले आहेत.
पिंपरी-चिंचवड शहराची लाेकसंख्या झपाट्याने वाढत आहे. सद्यस्थितीत शहरवासीयांना ६२० ते ६३० दशलक्ष लीटर (एमएलडी) पाणी एका दिवसाला दिले जात आहे. वाढत्या लोकसंख्येला हे पाणी पुरत नाही. मागील सहा वर्षांपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. लोकसंख्या वाढली. मात्र, पाण्याची उपलब्धतता वाढली नाही. त्यामुळे उन्हाळ्यात पाण्याची समस्या गंभीर होते. विस्कळीत, अपुरा, कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारींमध्ये वाढ होते. फेब्रुवारी उजाडताच सोसायट्यांचे बोअरवेल कोरडे पडतात. त्यामुळे शहरातील अनेक मोठ्या साेसायट्यांना टँकरच्या पाण्याचा आधार घ्यावा लागत आहे.
एकत्रित बांधकाम व विकास नियमावलीनुसार (यूडीसीपीआर) २० हजार चौरस मीटरपुढील क्षेत्रफळावरील, शंभर सदनिका आणि दररोज वीस हजार लिटर पाण्याचा वापर करणाऱ्या गृहनिर्माण सोसाट्यांना पाण्याचा पुनर्वापर व पुनर्रचक्रीकरण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. पिंपरी-चिंचवड शहरात ४५६ मोठ्या गृहनिर्माण सोसायट्या आहेत. त्यांपैकी २६४ सोसायट्यांमधील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) कार्यान्वित आहेत. तर, ‘एसटीपी’ सुरू करण्याचे वारंवार आवाहन करूनही १८४ साेसायट्यांमधील ‘एसटीपी’ विविध कारणांनी बंदच आहेत. त्यामुळे महापालिकेने सोमवारपासून नळजोड बंद करण्याची कारवाई सुरू केली आहे. सोमवारी मोशी, बोऱ्हाडेवाडीतील तीन सोसायट्यांचा पाणीपुरवठा खंडित करण्यात आला आहे. मंगळवारपासून कारवाईच्या पथकांत वाढ केली जाणार आहे. संपूर्ण शहरात कारवाई करण्यात येणार असल्याचे कार्यकारी अभियंता हरविंदर बन्सल यांनी सांगितले.
पहिल्या टप्प्यात ५० सोसायट्यांवर कारवाई
‘एसटीपी’ कार्यान्वित करण्याबाबत शहरातील ५० सोसायट्यांना तीन नोटिसा दिल्या. त्यानंतरही त्यांनी एसटीपी कार्यान्वित केला नाही. त्यामुळे पहिल्या टप्प्यात या सोसायट्यांचे नळजोड बंद करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. तर, उर्वरित १३४ सोसायट्यांना तिसरी नोटीस देण्याची कार्यवाही सुरू आहे.
एसटीपी बंद असलेल्या ५० सोसायट्यांचे नळजोड बंद करण्याची कारवाई सुरू केली आहे. उर्वरित १३४ सोसायट्यांना तिसरी नोटीस देण्यात येत आहे. ही नोटीस दिल्यानंतर सात दिवसांनी या सोसायट्यांचे नळजोडही बंद केले जाणार आहेत. – संजय कुलकर्णी,मुख्य अभियंता, पिंपरी-चिंचवड महापालिका