पिंपरी- चिंचवड: वृद्ध प्रवाशी महिलांना चाकूचा धाक दाखवून लुटणाऱ्या तिघांना गुन्हे शाखा युनिट चार ने अटक केली आहे. आरोपींकडून जवळपास तेरा तोळे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहे. ही घटना भुजबळ चौक वाकड बस स्थानक जवळ घडली होती. आबासाहेब अंकुश मदने, कैलास पांडुरंग टोंपे आणि वैभव जनार्दन सुर्यतळ अशी अटक करण्यात आरोपींची नाव आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन वृद्ध महिला खोपोलीला जाण्यासाठी भुजबळ चौकातून आरोपींच्या गाडीत बसल्या. आरोपींची गाडी खासगी आहे, हे त्यांना माहीत नव्हतं. काही अंतरावर गेल्यानंतर दोन्ही प्रवाशी महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने बघितल्यानंतर आरोपींनी काही अंतरावरून गाडी कात्रजच्या दिशेला वळवली. कात्रजच्या बोगद्यात नेऊन महिलांना धमकावत चाकूचा धाक दाखवून लुटलं. या प्रकरणी महिलांनी पोलिसांमध्ये तक्रार दिली होती. गुन्हे शाखा युनिट चार चे पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू केला.

ज्या गाडीतून महिलांना घेऊन जाण्यात आलं त्या गाडीचा शोध सुरू केला. अनेक ठिकाणचे सीसीटीव्ही तपासले. अखेर पोलीस आरोपींपर्यंत पोहचले. त्यांना याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून तेरा तोळे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. ही कारवाई गुन्हे पोलीस उपायुक्त शिवाजी पवार, सहाय्यक पोलीस आयुक्त विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांच्या टीम ने केली आहे.