पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात गणेशोत्सव शांततेत पार पडण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाने जय्यत तयारी केली आहे. तीन हजारांहून अधिक पोलिसांचा बंदोबस्त तैनात असणार आहे.

या वर्षी आयुक्तालयाच्या हद्दीत दोन हजार १४६ सार्वजनिक गणपती आणि दोन लाख ६५ हजार २७४ घरगुती गणपतींची स्थापना होणार आहे. सार्वजनिक गणेश विसर्जन ४५ घाटांवर होणार असून, सातव्या दिवशी ५२१ गणपती, नवव्या दिवशी २३६ गणपती, दहाव्या दिवशी ३७३ गणपती, अकराव्या दिवशी ९५९ गणपतींचे विसर्जन होणार आहे.

नागरिकांना अडचण येऊ नये यासाठी पोलीस ठाण्यांनी विविध उपाययोजना केल्या आहेत. पोलीस उपायुक्त, पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी आणि परिमंडळीय पोलीस उपायुक्त यांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे, शांतता समिती, ध्वनीवर्धक चालक, मालक आणि सरकारी विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठका घेतल्या आहेत. डीजे, ध्वनीवर्धक, प्रकाशझोताचा वापर टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी एक हजार ८०९ समाजकंटकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असल्याचे अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड यांनी सांगितले.

उत्सव काळात शांतता राखण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. यात एक पोलीस सह आयुक्त, एक अपर पोलीस आयुक्त, सहा पोलीस उपायुक्त, नऊ सहायक पोलीस आयुक्त, ६४ पोलीस निरीक्षक, २९१ सहायक, उपनिरीक्षक, दोन हजार ३५५ पोलीस अंमलदार, ४०० होमगार्ड, एक बीडीडीएस पथक असा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.

चौकांमध्ये वाहतूक पोलीस तैनात

उत्सवादरम्यान वाहतूक कोंडी टाळण्यासाठी, शहरातील महत्त्वाच्या चौकांमध्ये वाहतूक पोलीस तैनात करण्यात आले आहेत. त्यांच्या मदतीसाठी दोन अधिकारी आणि शंभर होमगार्ड्सचे अतिरिक्त मनुष्यबळ पुरवण्यात आले आहे. विसर्जनाच्या सातव्या आणि अकराव्या दिवशी ३८ महत्त्वाच्या मिरवणूक मार्गांवरील वाहतूक वळवण्यात आली आहे.