पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील चालू आर्थिक वर्षातील मालमत्ताकर न भरलेल्या मालमत्ताधारकांच्या पहिल्या सहामाहीच्या रकमेवर प्रतिमहिना दोन टक्के विलंब शुल्क (दंड) लागू झाला आहे. याबाबतची माहिती करआकारणी व करसंकलन विभागाने दिली.
पिंपरी-चिंचवड शहरात निवासी, व्यावसायिक, माेकळ्या जमीन, औद्याेगिक आणि मिश्र अशा सात लाख ३५ हजार नाेंदणीकृत मालमत्ता आहेत. या मालमत्ताधारकांकडून महापालिकेच्या करआकारणी व करसंकलन विभागामार्फत कराची वसुली केली जाते. या विभागाला चालू आर्थिक वर्षात (२०२५-२६) दीड हजार काेटी रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.
चालू आर्थिक वर्षातील मालमत्ताकर न भरलेल्या मालमत्ताधारकांच्या पहिल्या सहामाहीच्या रकमेवर प्रतिमहिना दोन टक्के विलंब शुल्क (दंड) लागू झाला आहे. दुसऱ्या सहामाहीतील ऑक्टोबर २०२५ ते मार्च २०२६ या काळातील देयकातील रकमेवर लवकरच दोन टक्के विलंब शुल्क लागू होणार आहे. त्यामुळे मालमत्ताधारकांनी वेळेत कर भरणा करून अतिरिक्त भुर्दंड दंड टाळावा, असे आवाहन महापालिका करआकारणी व करसंकलन विभागाने केले आहे.
थकबाकीदारांवर जप्तीची कारवाई
मालमत्ताकर वसुली मोहिमेला गती देण्यात आली आहे. थकबाकीदारांवर जप्तीची कारवाई हाती घेतली जाणार आहे. थकबाकीदारांना नोटीस बजावण्यात आली आहे. विविध ठिकाणी थेट मालमत्तांवर जप्तीची कारवाई करण्यासाठी करसंकलन विभागाच्या १८ विभागीय कार्यालयांमार्फत कारवाई सुरू करण्यात येणार आहे.
थकबाकीचे प्रमाण जास्त आहे. ज्या मालमत्ताधारकांनी अद्याप कर भरलेला नाही. त्यांनी विलंब न करता तत्काळ कर भरणा करावा. थकबाकी रक्कम न भरल्यास जप्तीची कारवाई केली जाणार आहे, असे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाचे उपायुक्त पंकज पाटील यांनी सांगितले.
निवडणुकीचा कर वसुलीला फटका?
पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक जानेवारी महिन्यात होण्याची शक्यता आहे. त्याचा कर वसुलीवर परिणाम होऊ शकेल. कर संकलन विभागातील कर्मचाऱ्यांना निवडणुकीचे कामकाज सोपविण्यात आले आहे. आचारसंहितेमध्ये दीड महिन्याचा कालावधी जाण्याची शक्यता आहे. या कालावधीत कर वसुली मोहीम थंडावेल. त्यामुळे कर आकारणी व कर संकलन विभागाने १८ विभागीय कार्यालयातील सर्व गटमुखांना थकबाकीदारांच्या मालमत्ता लाखबंद करणे, पाणीपुरवठा खंडीत करण्याचे आदेश दिले आहेत.
थकबाकी असलेल्या ३५ मालमत्ता लाखबंद, १०५ नळजोड खंडित
वारंवार आवाहन करून, तसेच नोटीस देऊनही मालमत्ता कर न भरणाऱ्या मालमत्ताधारकांवर कारवाईचे निर्देश महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिले आहेत. त्यानुसार कारवाईसाठी १८ विभागीय कार्यालयांतील गटप्रमुखांना जबाबदारी देण्यात आली आहे. शहरातील निवासी तसेच बिगरनिवासी थकबाकीदारांवर कारवाई सुरू आहे.
पथकांनी थकबाकीदारांच्या मालमत्तांना भेट देऊन लाखबंदीची प्रक्रिया सुरू केली आहे. १८ पथके वसुली मोहीम राबवत आहेत. आतापर्यंत ३५ मालमत्ता लाखबंद करण्यात आल्या असून, १०५ मालमत्ताधारकांचे नळजोड खंडित करण्यात आले आहेत.
