पिंपरी- चिंचवड: ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असणाऱ्या रावण टोळीला गुंडा विरोधी पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. तीन अल्पवयीन मुलांचा देखील यात समावेश आहे. रावण टोळीकडून पिस्तुल, जिवंत काडतुसे, लोखंडी कोयता, गुप्ती, मिर्ची पूड, बांबू, रस्सी असा दरोडा टाकण्यासाठी लागण्यात येणार साहित्य जप्त केल आहे.

अनिरुद्ध उर्फ बाळ्या उर्फ विकी राजू जाधव, अभिषेक उर्फ बकासुर चिमाजी पवार, यश उर्फ गोद्या आकाश खंडागळे, शुभम गोरखनाथ चव्हाण, प्रद्युमन राजकुमार जवळगे, सोहन राजू चंदेलिया अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नाव आहेत. यांच्यासह तीन अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

गुंडा विरोधी पथकातील पोलीस कर्मचारी बाबा आणि दळवी यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, पाटील नगर येथील पाण्याच्या टाकीच्या पुढे आठ ते नऊ जण संशयित रित्या थांबले असून त्यांच्याकडे धारदार हत्यार आहेत. याबाबतची माहिती सहायक पोलीस निरीक्षक हरीश माने यांना सांगितल्यानंतर सापळा रचून त्यांना ताब्यात घेतलं. हे सर्वजण स्विफ्ट आणि ऑडी कारमधून दरोडा टाकण्यासाठी जाणार होते. त्या आधीच गुंडाविरोधी पथकाने सराईत गुन्हेगारांना बेड्या ठोकले आहेत.

आरोपींकडून १५ लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच दरोडा टाकण्यासाठी लागणारे साहित्य देखील गुंडाविरोधी पथकाने जप्त केल आहे. याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरोडा टाकण्याच्या तयारीत असताना गुंडा विरोधी पथकाने कारवाई करत रावण टोळीतील सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या आहेत. ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, गुन्हे पोलीस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार, सहाय्यक पोलीस आयुक्त पोलीस आयुक्त विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडा विरोधी पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश माने यांच्या पथकाने केली आहे.