पिंपरी : मागील आठवड्यात झालेल्या पावसामुळे पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागांतील रस्त्यांवर लहान-मोठे खड्डे पडले आहेत. चालकांना ते चुकवून मार्गक्रमण करावे लागत आहे. त्यामुळे वाहतूक मंदावली आहे. शहरात केवळ ५८२ खड्डे असून ते बुजविण्याचे काम सुरू आहे. दिवाळीपूर्वी सर्व खड्डे बुजविण्यात येणार असल्याचे स्थापत्य विभागाने सांगितले.

यंदा पावसाला मे महिन्यातच सुरुवात झाली. त्यामुळे विविध भागांतील रस्त्यांवर माेठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. शहरात बारा फुटांपासून ८० फूट रुंदीचे रस्ते आहेत. पक्के, कच्चे असे दोन हजार ७३ किलोमीटर अंतराचे रस्ते आहेत. डांबरी, तसेच काँक्रीटचे रस्ते आहेत. साडेचार महिन्यांत या रस्त्यांवर चार हजार ६५ खड्डे आढळले आहेत. त्यांपैकी महापालिकेने डांबर आणि कोल्ड मिक्सने एक हजार ४२४, बीबीएमने ३१३, खडीने एक हजार २०३, पेव्हिंग ब्लॉकने २७५, सिमेंट काँक्रिटने ४८१ असे तीन हजार ६९६ खड्डे पूर्णतः बुजविले आहेत. त्याचे प्रमाण ८६.४० टक्के आहे.

शहरात केवळ ५८२ खड्डे बुजविण्याचे बाकी असल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे. मात्र, शहरातील विविध भागातील रस्त्यांवर सर्वत्र खड्डेच खड्डे दिसून येत आहेत. खड्डेमय रस्त्यांवरून अत्यंत संथगतीने वाहने पुढे सरकत आहेत. दुचाकीस्वारांना खड्डेमय रस्त्यांवरून पुढे जाताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

मेट्राे प्रशासनाला मुहूर्त मिळेना

निगडी ते चिंचवड या सेवा रस्त्यांवर मेट्राेचे काम सुरू आहे. त्यामुळे हा रस्ता मेट्राेच्या ताब्यात देण्यात आला असून, या मार्गावर माेठे खड्डे पडले आहेत. हे खड्डे बुजविण्यासाठी महापालिकेने तीन वेळा पत्रव्यवहार केल्यानंतर महापालिका आणि वाहतूक पाेलिसांनी वाहतूक वळवावी. त्यानंतरच खड्डे बुजविण्यात येतील, असे मेट्राे प्रशासनाने सांगितले. मात्र, यावर अद्याप कोणताही निर्णय झाला नाही. खड्ड्यांमुळे दहा मिनिटांच्या अंतरासाठी वाहनचालकांना अर्धा तास लागत आहे.

साडेचार महिन्यांत शहरात चार हजार ६५ खड्डे पडले. त्यांपैकी तीन हजार ६९६ खड्डे बुजविले असून, ५८२ खड्डे बुजविणे बाकी आहे. पावसाने विश्रांती दिल्याने खड्डे बुजविण्याचे काम वेगाने सुरू आहे. दिवाळीपूर्वी शहरातील सर्व खड्डे बुजविले जातील, असे स्थापत्य विभागाचे सह शहर अभियंता देवन्ना गट्टूवार यांनी सांगितले.