पिंपरी : शहराचा लाेकसंख्या वाढीचा दर आणि सन २०४१ पर्यंतची लोकसंख्या विचारात घेऊन मुळशी धरणातून ७६० दशलक्ष लीटर (एमएलडी) पाणी शहरासाठी आरक्षित करण्याची मागणी राज्य सरकारच्या जलसंपदा विभागाकडे केली आहे. यासाठी लागण्यात येणारा पुनर्स्थापना खर्च देण्याची तयारी महापालिका प्रशासनाने दाखविली आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवडकरांना मुळशी धरणातील पाणी शासन देणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

पिंपरी-चिंचवड शहराला गेल्या चार वर्षांपासून एक दिवसाआड पाणी पुरवठा सुरू आहे. शहर चारही बाजूने झपाट्याने वाढत असून, लाेकसंख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. शहराची लोकसंख्या आजमितीला २७ लाखांवर पोहोचली आहे. शहरासाठी पवना धरणातून ५१०, आंद्रातून १००, भामा-आसखेड धरणाचे १६७ असे ७७७ दशलक्ष लीटर पाणी आरक्षित आहे. सध्या शहरवासीयांना दिवसाला पवना धरणातून ५१०, चिखलीतील जलशुद्धीकरण केंद्रातून ७० आणि औद्योगिक विकास महामंडळाकडून १३ असे ५९३ दशलक्ष लीटर पाणी देण्यात येत आहे. त्यानंतरही शहरातील विविध भागांतील साेसायट्यांना कमी दाबाने आणि अपुरा पाणी पुरवठा हाेत असल्याच्या तक्रारी येत आहेत.

हेही वाचा… गुंडांसाठी खूशखबर!… ‘येथे’ होणार आलिशान कारागृह

सध्याच्या लाेकसंख्या वाढीचा वेग लक्षात घेता २०३१ मध्ये शहराची लोकसंख्या ५२ लाख ७४ हजार तर २०४१ मध्ये ९६ लाख तीन हजार लाेकसंख्या हाेईल, असे अनुमान गृहित धरण्यात आले आहे. या लाेकसंख्येला सुमारे १५०० दशलक्ष लीटर पाणी आहे. त्यामुळे भविष्याचे आतापासून नियाेजन करणे काळाची गरज आहे. त्यानुसार महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने तयारी सुरू केली आहे. लाेणावळा येथील टाटा कंपनीच्या मुळशी धरणातून ७६० दशलक्ष लीटर पाणी मिळावे, असे पत्र महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने जलसंपदा विभागाला दिले आहे. पिण्याचे पाण्याचे आरक्षण औद्योगिक, व्यावसायिक व घरगुती या प्रकारामध्ये विभागून देणे आवश्यक आहे. औद्योगिक व व्यावसायिक कारणांसाठी १.५० टक्के व उर्वरीत ९८.५० टक्के घरगुती पिण्याच्या प्रयोजनात वापरले जाणार आहे.

हेही वाचा… कुमार विश्वास, विक्रम संपत यांची पुणे पुस्तक महोत्सवाला हजेरी, विविध भाषांतील पुस्तकांची दोनशे दालने…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लाेकसंख्या वाढीचा विचार करता मुळशी धरणातून ७६० दशलक्ष लीटर पाणी आरक्षित करावे, यासाठी जलसंपदा विभागाला पत्र दिले आहे. – श्रीकांत सवणे, मुख्य अभियंता, पिंपरी-चिंचवड महापालिका