पिंपरी-चिंचवड: पक्षफुटीनंतर पवार कुटुंब काही अपवाद वगळता एकत्र दिसलं नाही. दोन्ही राष्ट्रवादीतील नेत्यांना पुन्हा एकदा पवार कुटुंबाने एकत्र यावं अशी मनोमन इच्छा आहे. त्यांचं राजकीय मनोमिलन व्हावं. असं सातत्याने नेत्यांना वाटतं. यावर अनेक जण जाहीररीत्या बोलूनदेखील दाखवतात. प्रत्येक नेत्यांच्या, कार्यकर्त्यांच्या मनात पवार कुटुंब कधी एकत्र येणार याविषयी उत्सुकता आहे. यावर आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांना पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर उत्तर दिलं आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज पिंपरी-चिंचवड शहराचा जम्बो दौरा आहे. सकाळी नऊ वाजल्यापासून अजित पवारांनी दौऱ्याला सुरुवात केली. दुपारपर्यंत काळेवाडी येथील हॉटेलमध्ये अजित पवारांनी जनसंवाद (दरबार) ठेवला होता. असंख्य नागरिकांनी गर्दी केली, आपले प्रश्न अजित पवारांपुढे मांडले. काही जणांच्या प्रश्नांचा निकाल लागला तर काही जणांना निराशाजनक उत्तरं मिळाली. त्यांनतर त्यांनी महानगरपालिकेच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. त्यांनतर पत्रकारांशी संवाद झाला.
उपमुख्यमंत्री अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वेगवेगळ्या ठिकाणी परिवार मिलनाचा कार्यक्रम होणार आहे. साडेआठ वाजेपर्यंत अजित पवार आपल्या राष्ट्रवादीतील कार्यकर्ता, पदाधिकाऱ्यांना वेळ देणार आहेत. याच कार्यक्रमावरून “पवार कुटुंबाचं राजकीय मनोमिलन कधी होणार?” असं अजित पवारांना पत्रकारांनी प्रश्न विचारला. त्यावर अजित पवारांनी स्मित हास्य देत अगदी शेलक्या शब्दात इंग्रजीत ‘सजेशन फॉर अॅक्शन’ असं उत्तर दिलं.