पिंपरी : मावळ लोकसभा मतदारसंघात जोरदार शक्तिप्रदर्शन करत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज भरल्यानंतर कोणतीही प्रतिक्रिया न देता नमस्कार करून मुख्यमंत्री गेले. त्यामुळे कार्यकर्त्यांची निराशा झाली. दरम्यान, शंभर मीटरच्या आत महायुतीच्या कार्यकर्त्यांनी गर्दी करत जोरदार घोषणाबाजी केली.
आकुर्डीतून पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) कार्यालयापर्यंत पदयात्रा काढण्यात आली. पदयात्रेत कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दुपारी बाराच्या सुमारास पदयात्रा आकुर्डीत आली. मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, भाजपचे विधानपरिषद गटनेते प्रवीण दरेकर, आमदार अण्णा बनसोडे, सुनील शेळके, अश्विनी जगताप, महेंद्र थोरवे, महेश बालदी, उमा खापरे यावेळी उपस्थित होते.
सव्वाबाराच्या सुमारास मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह नेते बाहेर आले. प्रवेशद्वारासमोर कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. मुख्यमंत्री येताच कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. मोटारीची काच खाली करत शिंदे यांनी कार्यकर्त्यांचे स्वागत स्वीकारले. मात्र, कोणतीही प्रतिक्रिया न देता मुख्यमंत्री शिंदे निघून गेले. त्यामुळे कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला.