पिंपरी : गणपती स्टॉलवर एका मूर्तीकाराच्या पॅन्टमधून जबरदस्तीने १५ हजार रुपये चोरल्याची घटना बुधवारी दुपारी भोसरीत घडली. याबाबत गौरव दत्तात्रय नलावडे (२७, ओतूर, पुणे) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार बीपीएल सोलंकी गुजर (चाकण) आणि सुमित बनोस राठोड (चाकण) या दोघांना अटक केली आहे. यांच्यासह आणखी दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गौरव हे गणपती मूर्ती विक्रीच्या स्टॉलवर असताना, आरोपी सुमितने त्यांच्या पॅन्टच्या खिशातून १५ हजार रुपये जबरदस्तीने काढले आणि पळून जाण्याचा प्रयत्न केला. फिर्यादीने ‘चोर-चोर’ असा आवाज दिल्याने आजूबाजूच्या लोकांच्या मदतीने त्याला आणि त्याच्यासोबत असलेल्या बीपीएल गुजर याला पकडण्यात आले. भोसरी पोलिस तपास करत आहेत.
दिघीत ऑनलाईन गुंतवणुकीच्या नावाखाली १५ लाखांची फसवणूक
एका व्यक्तीची ऑनलाईन गुंतवणुकीच्या नावाखाली १५ लाख ३३ हजार रुपयांची फसवणूक झाल्याची घटना दिघीत घडली.
या प्रकरणी ४९ वर्षीय व्यक्तीने दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे समाजमाध्यमातील एका व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सहभागी झाले. त्यानंतर एका महिलेने त्यांच्याशी संपर्क साधला. तिच्या सल्ल्यानुसार फिर्यादीने विविध बँक खात्यांमध्ये एकूण १५ लाख ३३ हजार रुपये जमा केले. सुरुवातीला त्यांना ॲपमध्ये एक कोटी २१ लाख रुपयांचा नफा दिसला. मात्र, जेव्हा त्यांनी हा नफा काढण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांना तो ब्लॉक झाल्याचे दिसले. आरोपीने नफा काढण्यासाठी २४ लाख २२ हजार २७९ रुपये सेवा शुल्क भरण्यास सांगितले. फिर्यादीने पैसे नसल्याचे सांगताच आरोपींनी त्यांच्याशी संपर्क करणे बंद केले. दिघी पोलीस तपास करत आहेत.
तडीपार गुंडाला शस्त्रासह अटक
पुणे जिल्ह्यातून तडीपार केलेल्या गुंडाला गुन्हे शाखेने शस्त्रासह अटक केली. गुंडाकडून दोन पिस्तूल आणि दोन काडतुसे जप्त केली.
पवन देवेंद्र बनेटी (२४, पिंपळे गुरव) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई गोविंद चव्हाण यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रक्षक चौक ते पिंपळे निलख रस्त्यावर एकजण शस्त्र घेऊन आल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट चारला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून पवन याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून १ लाख २ हजार रुपये किमतीची दोन देशी बनावटीची पिस्तूल आणि दोन काडतुसे जप्त केली. पवन बनेटी याला पिंपरी-चिंचवड पोलिसांनी पुणे जिल्ह्यातून तडीपार केले आहे. त्याचा तडीपारीचा कालावधी संपण्यापूर्वीच तो शहरात आला.
गांजा विक्री प्रकरणी दोघांना अटक
गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघांना अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. ही कारवाई बुधवारी (२६ ऑगस्ट) सायंकाळी म्हाळुंगे येथे करण्यात आली.
आकाश शिवाजी मोरे (२०, सुसगाव) आणि संतकुमार जगनारायण प्रजापती (२५, सुसगाव) या आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई कपिलेश ईगवे यांनी बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, म्हाळुंगे येथे एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेसमोर दोघेजण गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून आकाश आणि संतकुमार या दोघांना अटक केली. त्यांच्याकडून ७६ हजार ५०० रुपये किमतीचा २१२ ग्रॅम गांजा जप्त केला आहे. बावधन पोलीस तपास करत आहेत.
पिंपरीतील एच. ए. मैदानावर गांजा पकडला
पिंपरी येथील एच. ए. मैदानावर गांजा विक्रीसाठी आलेल्या एका व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई बुधवारी (२७ ऑगस्ट) सायंकाळी करण्यात आली. मीरशाकिरजाकीर हुसेन (२८, गांधीनगर, पिंपरी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी पोलीस शिपाई संतोष रजपूत यांनी संत तुकाराम नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हुसेन याच्याकडून २७ हजार ५०० रुपये किमतीचा ५६० ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला आहे.