पिंपरी : किरकोळ वाद झाल्यानंतर एका नेपाळी तरुणाने मित्राच्या डोक्यात बिअरची रिकामी बाटली मारून त्याला गंभीर जखमी केले. ही घटना आयटी पार्क हिंजवडीमध्ये घडली. याप्रकरणी २७ वर्षीय तरुणाने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एका नेपाळ मधील तरुणासह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी यांच्यामध्ये शनिवारी दुपारी किरकोळ वाद झाला होता. त्यामुळे रात्री फिर्यादी आणि इतर मित्र गप्पा मारत असताना आरोपी त्यांच्यासोबत बोलत नव्हता. फिर्यादीच्या मित्राने आरोपीला समजावण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आरोपीने बिअरची रिकामी बाटली फिर्यादीच्या डोक्यात मारून त्यांना गंभीर जखमी केले. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.
निगडीत शेजाऱ्याकडून लोखंडी गजाने मारहाण
शेजाऱ्यांनी ‘तुम्ही आमच्याबद्दल बोलत होता का’ असे विचारून शिवीगाळ करत एकास लोखंडी गजाने मारहाण केल्याची घटना निगडी येथील अजिंठानगरमध्ये घडली.
याप्रकरणी ३३ वर्षीय तरुणाने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या आई आणि वडिलांसोबत घरात बोलत असताना शेजारी राहणाऱ्या आरोपीने त्यांचा दरवाजा वाजवला. आरोपीने फिर्यादीला घराबाहेर बोलावून ‘तुम्ही आमच्याबद्दल बोलत होता का?’ असे विचारले. यावरून राग आल्याने त्याने फिर्यादीला शिवीगाळ करून लोखंडी गजाने डोक्यात मारले. आरोपीने फिर्यादी, त्यांची आई आणि वडिलांना हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. निगडी पोलीस तपास करित आहेत.
बेकायदा पिस्तूल बाळगल्याप्रकरणी एकाला अटक
बेकायदा पिस्तूल बाळगल्या प्रकरणी पिंपरी पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे. ही कारवाई रविवारी (१० ऑगस्ट) दुपारी शंकरनगर, विद्यानगर येथील खानीजवळ करण्यात आली.
याप्रकरणी पोलीस नाईक रामचंद्र तळपे यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी सूरज शहाजी शेवाळे (२५, अष्टविनायक चाळ, पावनेगाव, तुर्भे, नवी मुंबई) याला पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यानगर येथे खानीजवळ एकजण पिस्तूल घेऊन आल्याची माहिती पिंपरी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सूरज शेवाळे याला ताब्यात घेतले. त्याच्या कडून ४० रुपये किमतीची पिस्तूल आणि ५०० रुपये किमतीचे एक जिवंत काडतूस जप्त केले आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.
भोसरीत ‘गॅस रिफिलिंग’चा प्रकार उघड
घरगुती सिलेंडरमधून गॅसची अवैधरित्या चोरी करताना भोसरी पोलिसांनी एका तरुणाला पकडले आहे. ही कारवाई भोसरी येथील चक्रपाणी वसाहतमधील एका दुकानात करण्यात आली.
याप्रकरणी पोलीस नाईक प्रकाश भोजणे यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी भरलेल्या घरगुती गॅस सिलिंडरमधून मोकळ्या सिलिंडरमध्ये गॅस भरत होता. मानवी जीवनाला धोका निर्माण होईल हे माहित असूनही त्याने ज्वालाग्राही पदार्थाबाबत कोणतीही खबरदारी घेतली नाही. पोलिसांनी घटनास्थळावरून ९४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. भोसरी पोलीस तपास करित आहेत.