खासगी जागेत सलग पाच वर्षे गणेशोत्सव साजरा केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुढील पाच वर्षांसाठी एकाच वेळी आवश्यक सर्व परवाने देण्यात येतील, अशी घोषणा पालिकेचे प्रशासक तथा आयुक्त राजेश पाटील यांनी बैठकीत केली. उत्सवकाळात गणपती मंडळांनी महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहनही आयुक्तांनी केले. दरम्यान, उत्सवाशी संबंधित निर्णय घेताना मंडळांना विश्वासात घ्यावे, अशी अपेक्षा मंडळांकडून व्यक्त करण्यात आली.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर, पालिका आयुक्तांच्या उपस्थितीत मुख्यालयात बैठक पार पडली. अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, शहर अभियंता मकरंद निकम, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, मुख्य अग्निशमन अधिकारी किरण गावडे आदी उपस्थित होते.
पाच वर्षासाठी एकदाच परवाने दिले जाणार –
यावर्षीपासून खासगी जागेत मंडप उभारून गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळांना एक वर्षाऐवजी पुढील पाच वर्षांसाठी एकदाच परवानगी देण्यात येणार आहे. अशा मंडळांना पुढील पाच वर्षांपर्यंत अर्ज सादर करावे लागणार नाहीत. अटी शर्तीस अधीन राहून पुढील पाच वर्षासाठी पालिकेकडून एकदाच परवाने दिले जाणार आहेत.
मूर्ती संकलनासाठी फिरते रथ ठेवण्यात येतील –
शाडू मूर्ती, तुरटीच्या किंवा कागदी लगद्यापासून बनविलेल्या पर्यावरणपूरक मूर्तींचा वापर करावा. लाकूड, दगडांपासून बनविलेल्या पुनर्वापर करता येणाऱ्या मूर्तींचा वापर करावा. गणेश विसर्जनाच्या ठिकाणी सफाई कर्मचाऱ्यांसह सुरक्षा, अग्निशमन, आरोग्य सेवक, जीवरक्षक, मदतनीस, आपत्ती व्यवस्थापन पथकाची नेमणूक केली जाईल. आवश्यक ठिकाणी निर्माल्य कुंड ठेवण्यात येतील. मूर्ती संकलनासाठी फिरते रथ ठेवण्यात येतील, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
यंदा देशभक्तीपर देखावे करावेत –
नागरिकांनी निर्माल्य व पूजा साहित्य कुंडातच टाकावे. विसर्जनाच्या ठिकाणी कचरा, सजावटीचे व पूजेचे साहित्य जाळू नये, गणेश मंडळांनी आरोग्य, सामाजिक संदेश तसेच स्वच्छताविषयक जाहिराती प्रदर्शित करण्यास प्राधान्य द्यावे. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून देशभक्तीपर देखावे आणि कार्यक्रमाचे आयोजन करावे. ‘हर घर तिरंगा’ या उपक्रमात सहभागी व्हावे, मंडळांनी जनजागृती मोहीम राबवावी, असे आवाहन पालिकेने केले आहे.
मंडळांना विश्वासातही घेतले पाहिजे –
“गणेश मंडळांकडून जनजागृती करण्यासह अनेक बाबतीत अपेक्षा ठेवण्यात येतात. त्यानुसार मंडळांना विश्वासातही घेतले पाहिजे. समन्वय ठेवला पाहिजे. खासगी जागेतील मंडळांना परवाना देण्याच्या निर्णयांचा फायदा मोजक्याच मंडळांना होणार आहे. बहुसंख्य मंडळांना या निर्णयाचा उपयोग नाही. अटी, शर्ती निर्धारित करून सर्वच मंडळांना पाच वर्षांसाठी परवाने द्यायला हवेत. आगमन ते विसर्जन या उत्सव कालावधीत मंडळांना अनेक अडचणी येतात. त्याविषयी मंडळांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत चर्चा व्हायला हवी. महापालिकेने एकतर्फी निर्णय घेऊ नये आणि ते मंडळांवर लादू नयेत.” असे चिंचवडमधील गांधीपेठ तालीम मंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ गोलांडे यांनी म्हटले आहे.