‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ अशी भावपूर्ण साद घालत 28khandobaपिंपरी-चिंचवड शहरातील मंडळांनी गणरायाला भावपूर्ण निरोप दिला. पिंपरीतील मिरवणूक अकरा तास तर चिंचवडची १२ तास चालली. ढोल-ताशांचा दणदणाट, चित्तथरारक प्रात्यक्षिके, आकर्षक रोषणाई, सजवलेल्या रथांची रेलचेल, झगमगाट आणि वेगवेगळ्या पथकांचा समावेश असलेल्या गणेश मंडळांनी मोठय़ा उत्साहात मिरवणुकांमध्ये सहभाग घेतला. मंडळ-मंडळात तसेच पोलीस व कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या किरकोळ वादावादीचे प्रकार वगळता दोन्हीकडील मिरवणूक शांततेत पार पडली. आगामी निवडणुकांच्या तयारीचा भाग म्हणून आजी-माजी नगरसेवक व इच्छुक उमेदवारांनी मोक्याची जागा गाठून ‘चमकोगिरी’ करण्याची संधी सोडली नाही.
चिंचवडगावातील चापेकर चौक तसेच पिंपरी बाजारपेठेतील कराची चौकात महापालिकेने स्वागत कक्ष उभारले होते. महापौर शकुंतला धराडे, आयुक्त राजीव जाधव, सहआयुक्त दिलीप गावडे यांनी दोन्हीकडील मंडळांचे स्वागत केले. नेहमीच्या तुलनेत यंदा मंडळांची संख्या रोडावल्याचे व गर्दीतही घट झाल्याचे दिसून आले. पिंपरीत  ८७ तर चिंचवडला ३६ मंडळांनी विसर्जन केल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले. मंडळांच्या कार्यकर्त्यांचा उत्साह मात्र कायम होता. सकाळी घरगुती गणपतींचे विसर्जन सुरू झाले, दुपारी एकपासून मंडळे रस्त्यावर येऊ लागली, त्याचे प्रमाण अत्यल्प होते. सायंकाळी साडेसातनंतर मंडळांच्या मिरवणुका एकापाठोपाठ आल्याने रंगत वाढू लागली. चिंचवडला गांधीपेठ मंडळाने विसर्जन मिरवणुकीचा खर्च कमी करून दुष्काळ निधी गोळा केला, त्यांच्या मिरवणुकीतील हिमांशू गुमाने हा बालवादक सर्वाच्या कौतुकाचा विषय ठरला. आयुक्त राजीव जाधव यांनाही मोबाईलमध्ये त्याचे चित्रण करण्याचा मोह आवरला नाही. उत्कर्ष मंडळाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छता मोहिमेचा प्रसार करणारा देखावा केला. ज्ञानदीप मंडळाने फुलांच्या तोफेची सलामी देतानाच स्वाईन फ्लूसारख्या आजाराविषयी जनजागृतीचा प्रयत्न केला. समर्थ मंडळाने फुलांचा रथ केला. साईनाथ मंडळाने शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा विषय मांडून असा अविचार न करण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केले. झुंजार मंडळाने मिरवणुकीत नाचणारे घोडे आणले होते. मारूती बोरसे या ९५ वर्षीय वृध्दाने चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर करून उपस्थितांची मनेजिंकली. िपपरी भाजीमंडईतील विक्रेत्यांच्या लाल बहादूर शास्त्री मंडळाने यंदाही वारकरी पथक तसेच गुलालाऐवजी फुलांची वृष्टी करण्याची परंपरा जपली. राष्ट्तेज मंडळाचा ‘पाणी वाचवा’ असा संदेश देणारा रथ होता. शिवराजे प्रतिष्ठानने गणेश रथात विराजमान झालेले शिवछत्रपती असा आकर्षक देखावा मांडला होता. ‘फायर शो’चा प्रयत्न करणाऱ्या मंडळांना पोलीसांनी अटकाव केला. दरमायान, प्राधिकरणात राहणाऱ्या अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने गणेश तलाव येथे कुटुंबियांसमवेत घरगुती गणपतीचे विसर्जन केले. िपपरी व चिंचवड अशा दोन्हीकडील विसर्जन मिरवणुकीत अनेक सामाजिक संस्था, संघटनांनी सक्रीय सहभाग घेतला. विसर्जन घाटावर मदतीसाठी टाटा मोटर्सचे ३० कर्मचारी कार्यरत होते. ‘एम क्युअर’चे कर्मचारी निर्माल्य बाजूला करण्यात मदत करत होते. घाटावर बोटी व तराफा सज्ज होत्या. जीवरक्षक, सफाई कामगारांची नियुक्ती होती. हौदात गणपती विसर्जन करण्याचे आवाहन करण्यात आले, त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. नदीपात्रात पुरेसे पाणी नसल्याने विसर्जन करताना अडचणी आल्याचे मंडळांकडून सांगण्यात येत होते. पोलीस उपायुक्त डॉ. बसवराज तेली, सहायक पोलीस आयुक्त मोहन विधाते यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. रात्री बारा वाजता पोलीसांनी मंडळांना वाद्ये वाजवण्यास मनाई केली, त्यावरून पोलीस व कार्यकर्ते यांच्यात वादावादी झाली. मात्र पोलीस आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने अतिउत्साही कार्यकर्त्यांचा नाईलाज झाला. अनंत चतुर्दशीच्या आदल्या दिवशी विसर्जनाची परंपरा असलेल्या भोसरी परिसरातील गणेश मंडळांचे विसर्जन शांततेत पार पडले. गेल्या वर्षी झालेल्या वादंगाच्या पाश्र्वभूमीवर पोलीसांनी यंदा चोख बंदोबस्त ठेवला होता.
– मिरवणुकीतील वैशिष्टय़े–
– नेहमीच्या तुलनेत उत्साह कमी; गर्दीतही घट
– गुलालाचा व फटाक्यांचा वापर कमी; भंडाऱ्याचा पर्याय; पुष्पवृष्टीवर भर
– मूर्तीदानाच्या आवाहनाला भरभरून प्रतिसाद
– हौदात जवळपास ४०० गणपतींचे विसर्जन
– अनेक मंडळांच्या मिरवणुकीत महिलांचा मोठा सहभाग आणि जल्लोषही
– नदीपात्रात पुरेसे पाणी नसल्याच्या मंडळांच्या तक्रारी

‘शांताबाई’ आणि ‘चिमणी उडाली’चा कहर
विसर्जन मिरवणुकांमध्ये डीजेच्या दणदणाटात नव्या-जुन्या गाण्यांच्या तालावर तरूर्णाईने अक्षरश: धूमाकूळ घातला. ‘शांताबाई’, ‘चिमणी उडाली भूर्र’, ‘वाट बघतोय रिक्षावाला’, ‘कोंबडी पळाली’, ‘बिलनची नागीन निघाली’, मुंगळा, ‘मै हू डॉन’, ‘नाच रे मोरा’ ही नेहमीची यशस्वी गाणी मिरवणुकीत चांगलीच वाजली.

‘चापेकर बंधूंचे स्मारक होणार कधी’
चिंचवड गावातील चापेकर बंधूंच्या स्मारकाचा विषय प्रदीर्घ काळापासून प्रलंबित आहे. मयूरेश मित्र मंडळाने विसर्जन मिरवणुकीत हा विषय सूचक पध्दतीने मांडला. चिंचवडकरांनो, किती दिवस मी वाट पाहू, असा प्रश्न थेट चापेकरांनीच विचारल्याचे देखाव्यात मांडले होते. आयुक्त राजीव जाधव स्वागत कक्षात होते, त्यांच्यापुढे हा विषय मांडण्यात आला, तेव्हा आयुक्तांनाही त्याची दखल घ्यावी लागली.