पिंपरी : महापालिकेचा अग्निशामक विभाग आणि आठही क्षेत्रीय कार्यालयांकडून फटाका स्टॉलसाठी परवानगी देण्यात येत आहे. आतापर्यंत ६० व्यावसायिकांनी परवानगी घेतली आहे. विनापरवाना फटाके स्टॉलवर कारवाईचा इशारा अग्निशामक विभागाने दिला आहे. परवानगी घेऊनच स्टॉल उभारण्याचे आवाहन महापालिकेने केले.

दिवाळीचा सण काही दिवसांवर आला आहे. फटाके विक्रेत्यांची लगबग सुरू आहे. शहरात दर वर्षी अनेक स्टॉल परवानगी न घेताच उभारले जातात. परंतु, यंदा महापालिकेने कडक धोरण राबविण्याचा निश्चय केला आहे. फटाका स्टॉलसाठी महापालिकेच्या अग्निशामक विभाग आणि आठही क्षेत्रीय कार्यालयांकडून दोन हजार रुपये शुल्क आकारून परवानगी देण्यात येत आहे. अग्निशामक विभागाकडून बांधकाम आणि शटर असलेल्या गाळ्यांमध्ये स्टॉल उभारण्यासाठी ना हरकत दाखला दिला जातो. तसेच, मोकळ्या जागेवर परवानगी दिली जात नसल्याचेही अग्निशामक विभागाकडून सांगण्यात आले.

हेही वाचा >>>पिंपरी : सांभाळण्यासाठी दिलेल्या श्वानाला डांबून ठेवून ठार मारले

शहर परिसरातून फटाका स्टॉल उभारण्यासाठी ६० जणांनी अर्ज केले होते. त्यांना अग्निशामक विभागाने परवानगी दिली आहे. बेकायदा फटाका स्टॉल उभारल्यास क्षेत्रीय कार्यालयाच्या अतिक्रमण विभागातर्फे कारवाई करण्यात येणार आहे. आगीच्या घटना टाळण्यासाठी स्टॉलशेजारी वाळू ठेवावी. फटाका स्टॉल परिसरात बिडी, सिगारेट पेटवू नये, ज्वलनशील पदार्थ ठेवू नये, स्टॉलपासून लहान मुलांना दूर ठेवावे. पाण्याची व्यवस्था ठेवावी, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अग्निशामक विभागाने दोन हजार रुपये परवानगी शुल्क आकारून ६० फटाका स्टॉलधारकांना परवानगी दिली आहे. व्यावसायिकांनी परवानगी घेऊनच स्टॉल उभारावा अन्यथा कारवाई केली जाईल, असे पिंपरी-चिंचवड महापालिकेचे उपायुक्त मनोज लोणकर यांनी सांगितले.