पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेने ११२ कोटी रुपये खर्च करून एक एप्रिल २०२५ पासून सुरू केलेली दस्तऐवज व्यवस्थापन प्रणाली ( डीएमएस) यंत्रणा मंगळवारपासून बंद पडली आहे. त्यामुळे दोन दिवसांपासून महापालिकेचे सर्व प्रशासकीय कामकाज ठप्प झाले आहे. आज (गुरुवारी) प्रणाली सुरू करण्यासाठी तांत्रिक उपाययाेजना केल्या जात असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

निगडी येथील डाटा सेंटरमध्ये विद्युतविषयक आणि तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने मंगळवारपासून ही यंत्रणा बंद आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने एक एप्रिलपासून कागदविरहित प्रशासनाकडे वाटचाल सुरू केली. कामकाजात दस्तऐवज व्यवस्थापन प्रणाली (डीएमएस) आणि कार्यप्रवाह प्रणाली (डब्ल्यूएफ) वापरण्यास सुरुवात केली. यासाठी पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेडने जीआयएस एनेबल ईआरपी प्रकल्पाअंतर्गत ३३ संगणक प्रणाली विकसित केल्या आहेत. महापालिकेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांचे वेतन व ठेकेदारांची देयके काढण्यासाठी ‘सॅप’ प्रणालीचा वापर केला जात आहे. विभागप्रमुख, वरिष्ठ अधिकारी, प्रशासन अधिकारी, शाखा प्रमुख, लिपिक यांना प्रशासकीय कामकाजासाठी डिजिटल कोड देण्यात आले आहेत. एक हजार ७०९ डिजिटल स्वाक्षरी ‘की’ तयार करण्यात आल्या आहेत. या प्रणालीवर ११२ कोटींचा खर्च करण्यात आला आहे.

महापालिकेच्या सर्व प्रकारच्या नस्ती तयार करण्यासाठी दस्तऐवज व्यवस्थापन आणि कार्यप्रवाह प्रणालीचा वापर केला जात आहे. या प्रणालीचा वापर करून सर्व कागदपत्रांचे स्कॅनिंग, ट्रॅकिंग, सामायिकरण व शोध घेतला जात आहे. मानवी हस्तक्षेपाने नस्ती स्वीकारणे बंद केले आहे. कार्यप्रवाह प्रणालीमुळे प्रत्येक नस्तीचे कामकाज वेळेत पूर्ण होत असून, वेळेची बचत होत असल्याचा दावा माहिती व तंत्रज्ञान विभागाचा आहे. प्रशासनाचे कामकाज पूर्णतः डिजिटल झाल्यामुळे निर्णयप्रक्रिया, पारदर्शकता वाढीस मदत हाेणार असल्याचे प्रशासनाचे मत हाेते. मात्र, या दस्तऐवज व्यवस्थापन प्रणालीत वारंवार व्यत्यय येत आहे. इंटरनेट आणि वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर नव्याने सर्व प्रक्रिया करावी लागते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

निगडीतील डाटा सेंटरमध्ये विद्युत विषयक आणि तांत्रिक अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे मंगळवारपासून ‘डीएमएस’ प्रणाली बंद आहे. प्रणाली सुरू करण्यासाठी तांत्रिक उपाययाेजना केल्या जात आहे. आज गुरुवारपर्यंत प्रणाली सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.किरणराज यादव,सह मुख्य कार्यकारी अधिकारी,पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी