पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाने स्वच्छ भारत मिशन अंतर्गत घरोघरी तिरंगा आणि स्वच्छता (हर घर तिरंगा, हर घर स्वच्छता) ही विशेष मोहीम सुरू केली आहे. त्या माध्यमातून देशप्रेम आणि स्वच्छतेचा जागर केला जात आहे.
मोहिमेचा पहिला टप्पा दोन ऑगस्टला सुरू झाला. त्यानुसार शहरातील शाळा, सार्वजनिक ठिकाणी व पर्यटनस्थळांवर तिरंगा चित्ररचना, रांगोळी आणि स्वच्छता उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीच्या भावनेसह स्वच्छतेचे महत्व अधोरेखित केले जात आहे. दुसऱ्या टप्प्यात तिरंगा मेळा, पर्यावरणपूरक तिरंगा असे विविध उपक्रम राबविले जातील. ‘तिरंगा मेळा’ मध्ये स्थानिक उद्योजकांना प्रोत्साहन देणारा उपक्रम असेल.
पर्यावरणपूरक तिरंगा उपक्रमाद्वारे प्लास्टिकऐवजी कापडाचा आणि पुनर्वापर करता येणाऱ्या साहित्याचा वापर करून तिरंगा बनवण्याचा निर्धार नागरिकांमध्ये निर्माण करण्यात येणार आहे. १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान मोहिमेचा तिसरा टप्पा असेल. त्यामध्ये स्वच्छतेशी निगडित महत्वाच्या ठिकाणी ध्वजवंदन करून त्या जागांचे संवर्धन केले जाणार असल्याचे आरोग्य विभागाचे उपायुक्त सचिन पवार यांनी सांगितले.
१५ ऑगस्टनंतर ध्वज संकलन
स्वातंत्र्य दिनानंतर नागरिकांनी वापरलेले राष्ट्रध्वजाचे संकलन महापालिका करणार आहे. वापरलेले ध्वज पुनर्प्रक्रिया (रिसायकल) केंद्रामध्ये जमा करावेत, असे आवाहन महापालिकेने केले आहे.
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करताना घरोघरी तिरंगा आणि स्वच्छता या मोहिमेचे नियोजन केले आहे. यामुळे नागरिकांमध्ये देशभक्तीची भावना वाढण्यासोबतच स्वच्छतेचे महत्वही अधोरेखित होईल. मोहिमेमध्ये शहरातील प्रत्येक नागरिकाने सहभागी व्हावे.-विजयकुमार खोराटे,अतिरिक्त आयुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका