लोकसत्ता प्रतिनिधी

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर आकारणी व करसंकलन विभागाने मालमत्ताकराच्या सवलती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी मीम्सनंतर आता ‘रिल्स’ स्पर्धेची शक्कल लढविली आहे. फेसबूक, इन्स्टाग्राम, ट्विटर आदी समाजमाध्यमातून नागरिकांना कर भरण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येणार असून रिल्स बनविणाऱ्यांना बक्षिस दिले जाणार आहे.

सध्या रिल्सच्या माध्यमातून गाणी, विनोद, ग्राफिक्स यांच्याद्वारे सामाजिक संदेश देण्यात येतो. रिल्स माध्यम नागरिकांच्या पसंतीस उतरले आहे. चित्रपट, गाणी, संगीत यांचा आधार घेऊन नव्या संकल्पनेची निर्मिती आज नव्या पिढीकडून होत असल्याने, करसंकलन विभागाने या माध्यमातून कर भरण्याचे आवाहन करण्यासाठी स्पर्धेचे आयोजन केले आहे. प्रथम क्रमांकास पाच हजार, द्वितीय तीन हजार आणि तृतीय क्रमांक येणाऱ्याला दोन हजार रुपयांचे बक्षिस देण्यात येणार आहे. कलाकारांच्या रिल्सला पालिकेच्या समाजमाध्यमातून प्रसिद्धी देण्यात येणार आहे. कर संकलन विभागाने राबविलेल्या उपक्रमांमुळे आणि विविध सवलतींमुळे आजपर्यंत दोन लाखांवर मालमत्ता धारकांनी तब्बल १३ कोटी रुपयांच्या सवलतींचा लाभ घेतला आहे. ३० जूनपूर्वी कर भरल्यास महापालिकेने करात सवलती दिल्या आहेत.

आणखी वाचा-आरटीओच्या संगणकीय प्रणालीत छेडछाड; बनावट योग्यता प्रमाणपत्र दिल्याचे प्रकार उघडकीस

हॅशटॅगचा वापर करून स्पर्धेत सहभागी व्हा!

रिल्स स्पर्धेत सहभागी होण्यासाठी स्पर्धकाने ३० जूनपर्यंतच आपल्या इन्स्टाग्राम, फेसबुक, ट्विटरवर रिल्स पोस्ट करावे. रील्स पोस्ट करताना #pcmcpraxreels #ptaxreels #pcmcptaxconcession या हॅशटॅगचा वापर करावा. रील्समधील योग्य हॅशटॅग, कल्पकता, नावीन्य यांचा निकालासाठी विचार करण्यात येणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रिल्स स्पर्धेच्या माध्यमातून नागरिकांना कर सवलतींचा लाभ घेण्याचे आणि मालमत्ताकर भरण्याचे आवाहन केले जाणार आहे. ३० जूनपर्यंत रील्स तयार करून स्पर्धेत सहभाग नोंदवावा. -नीलेश देशमुख, सहाय्यक आयुक्त, करआकारणी व करसंकलन विभाग, पिंपरी-चिंचवड महापालिका