पिंपरी : दिवाळीनिमित्त समाजमाध्यमांवर सवलतींचा वर्षाव सुरू आहे. मात्र, या आनंदोत्सवावर विरजण घालण्यासाठी सायबर चोरटे सज्ज झाले आहेत. ‘गिफ्ट लिंक’, ‘बंपर ऑफर’ आणि ‘कॅशबॅक’च्या आमिषाने नागरिकांची फसवणूक करणारे सायबर चोरटेही सक्रिय झाल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. त्यामुळे ऑनलाइन खरेदी करताना काळजी घेण्याचे आवाहन पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी केले आहे.

अनेक कंपन्यांच्या नावाने बनावट संकेतस्थळ तयार केले जाते. या संकेतस्थळावर आकर्षक ऑफर आणि मोठ्या सवलती दाखवून नागरिकांकडून पैसे घेतले जातात; मात्र ‘ऑर्डर’ केल्यानंतर वस्तू मिळत नाही किंवा निकृष्ट दर्जाचा माल पाठवला जातो. नागरिकांच्या मोबाइलवर ‘दिवाळी बोनस गिफ्ट हॅम्पर मिळवा’ किंवा ‘पाच हजार कॅशबॅक जिंका’ असे संदेश येतात. त्यात दिलेल्या लिंकवर क्लिक होताच मोबाइल बँकिंगची माहिती गुन्हेगारांच्या हाती लागते.

काही क्षणांत बँक खाते रिकामे होते. मागील वर्षी ऐन दिवाळीत सायबर चोरट्यांनी विविध पद्धतींनी नागरिकांना फसवले होते. १७ वेगवेगळ्या गुन्हे पद्धती वापरल्याचे समोर आले. ऑनलाइन खरेदी, गिफ्ट ऑफर आणि केवायसी अद्ययावत करण्याच्या नावाखाली फसवणुकीच्या घटना घडल्या होत्या. ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या सणासुदीच्या काळात सायबर गुन्ह्यांच्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे.

केवायसी अद्ययावत करण्याच्या नावाने फसवणूक

बँक खात्यासाठी केवायसी अद्ययावत करण्याच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर फसवणूक होत आहे. ‘तुमचे खाते बंद होणार आहे’, ‘केवायसी अपूर्ण आहे’ अशा संदेशांद्वारे ओटीपी आणि कार्डची माहिती घेतली जाते. त्या माध्यमातून फसवणूक केली जात असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.

ही काळजी घ्या

अनोळखी लिंक किंवा संदेशावर क्लिक करू नये, ओटीपी कोणालाही सांगू नये, बँक खाते, कार्ड, क्रेडिटची माहिती फोनवर देऊ नये, केवळ अधिकृत ॲप आणि संकेतस्थळावरूनच व्यवहार करावा. फसवणूक झाल्यास त्वरित १९३० या हेल्पलाइन किंवा cybercrime.gov.in या संकेतस्थळावर तक्रार करण्याचे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.

दिवाळीच्या काळात ऑनलाइन फसवणुकींमध्ये वाढ होते. नागरिकांनी कोणतीही लिंक उघडण्यापूर्वी तिचा स्रोत पडताळावा. सायबर गुन्हे केवळ तांत्रिक समस्या नाही, एक सामाजिक जबाबदारीचा प्रश्न आहे. प्रत्येक नागरिकाने खबरदारी घेणे गरजेचे आहे. जागरूकता हेच सर्वांत मजबूत कवच आहे.डॉ. शिवाजी पवार, पोलीस उपायुक्त (गुन्हे), पिंपरी-चिंचवड