scorecardresearch

Pune MIDC Fire : मृतांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारकडून पाच लाख रुपयांची मदत जाहीर!

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली माहिती; कंपनीतील आगीच्या चौकशीचे आदेश, अहवालानंतर जबाबदारी निश्चित होणार

समितीकडून आगीच्या कारणांची चौकशी करण्याचे आदेश पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत, असे देखील सांगितले.

“पुण्याच्या मुळशी तालुक्यातील उरवडे गावाजवळ रासायनिक कंपनीला लागलेल्या आगीत कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना दुर्दैवी, क्लेशदायक आहे. अग्निशमन दलाने आग विझवण्यासाठी, बचावासाठी शर्थीचे प्रयत्न करुनही काहींना वाचवता आलं नाही, हे अधिक दु:खदायक आहे. दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांबद्दल सहानुभूती असून मृतांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारकडून प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्यात येईल,” अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली.

मुळशी दुर्घटनेसंदर्भात अधिक माहिती देताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, “आग विझली असली तरी कुलींग ऑपरेशन सुरु आहे. ते पूर्ण झाल्यानंतर आगीचं प्राथमिक कारण कळू शकेल. मावळ प्रांताधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील तज्ञांच्या समितीकडून आगीच्या कारणांची चौकशी करण्याचे आदेश पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. त्या चौकशीतून आगीची नेमकी कारणे कळतील व दुर्घटनेची जबाबदारी निश्चित करता येईल. या आगीची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दल व स्थानिक प्रशासन तत्काळ घटनास्थळी पोहचलं होतं. जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिसप्रमुख, पीएमआरडीए आयुक्तांकडून यासंदर्भत अधिकची माहिती घेतल्यानंतर त्यांनाही तात्काळ दुर्घटनास्थळी पोहचून आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. जिल्हाधिकाऱ्यांनी परिस्थितीची पाहणी करुन चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यांच्या आदेशानुसार आगीची चौकशी होईल. पोलिसांनी प्राथमिक गुन्हा नोंदवून घेतला आहे. सद्यस्थितीत आग पूर्णपणे विझवणे आणि जखमींवर उपचारांना प्राधान्य देण्यात दिलं जात आहे. अशा प्रकारच्या घटना भविष्यात घडू नयेत, यासाठी आवश्यक खबरदारी घेण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला देण्यात येतील,” अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.

पिरंगुट अग्नितांडव : पंतप्रधान मोदींकडून मृतांच्या वारसांना प्रत्येकी २ लाखांची मदत जाहीर!

तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पिरंगुट औद्योगिक वसाहतीमधील केमिकल कंपनीस लागलेल्या भीषण आगीत मृत्यू झालेल्यांच्या वारसांना ‘पीएमएनआरएफ’मधून प्रत्येकी २ लाख रुपयांची, तसेच या दुर्घटनेतील जखमींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे.

पुणे : केमिकल कंपनीत भीषण आग; १८ कामगारांचा होरपळून मृत्यू

पिरंगुट येथील औद्योगिक वसाहतीमधील एसव्हीएस या कंपनीला आज दुपारी लागलेल्या भीषण आगीत १८ जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय काही कामगार अद्याप बेपत्ता आहेत. तर, १९ कामगारांना वाचवण्यात यश आलं आहे. दुपारी दोन वाजेच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली, त्यावेळी कंपनीत ३७ कामगार होते. या कंपनीत केमिकल बनवण्याचे काम सुरू होते, अशी माहिती समोर आली आहे. दरम्यान, आग लागल्याची माहिती मिळताच पोलीस व अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवण्यासीठी प्रयत्न सुरू केले. घटनास्थळी अग्निशामक दलाचे पाच बंब व रूग्णवाहिका देखील दाखल झालेली आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Pirangut fire accident state government announces rs 5 lakh assistance to families of victims msr