चिन्मय पाटणकर

आजच्या बदलत्या गावांचं दर्शन घडवण्याचा प्रयत्न रंगदृष्टी या संस्थेनं ‘गावकथा’ या नाटय़कृतीतून केला आहे. याचा प्रयोग १० ऑगस्टला सायंकाळी सात वाजता बाणेरच्या ड्रामालय इथं होत आहे.

काळ पुढे सरकतोय, तसा भवताल बदलतोय. हा बदल केवळ शहरांमध्येच होतोय असं नाही, तर गावाचंही रुपडं पालटतंय.. जागतिकीकरणाची चाहूल लागलेल्या १९९०पासून बदल सुरू झाले, पुढे तंत्रज्ञान, समाजमाध्यमांमुळे बदल अधिक वेगानं होत गेले. समकालीन लेखक बालाजी सुतार यांनी हे बदल त्यांच्या साहित्यातून टिपले आहेत. बालाजी सुतार यांच्या कथा, नोंदी, कवितांवर आधारित ‘गावकथा’ या नाटय़कृतींतून बदलत्या गावांचा कॅलिडोस्कोप दाखवण्यात आला आहे.

बालाजी सुतार यांचा ‘विच्छिन्न भोवतालाचे संदर्भ’ हा कथासंग्रह प्रकाशित आहे. ‘गावकथा’मध्ये गावातली परंपरागत व्यवस्था ते आजची जीवनशैली हा प्रवास या नाटय़कृतीतून उलगडला आहे. गावांचं वातावरण, तिथलं राजकारण, कुटुंबव्यवस्था, शेतीप्रश्न, शिक्षण, अर्थव्यवस्था या प्रमुख पाच विषयांसह गावाच्या एकूणच बदललेल्या ‘नॅरेटिव्ह’चा वेध ही नाटय़कृती घेते.

या गावबदलाचं चित्र समग्र पद्धतीनं, नाटय़प्रसंग आणि उभं करण्यात आलं आहे. स्वप्नील कापुरे, अमृता पटवर्धन, रश्मी साळवी, श्रुती मधुदीप, शुभम साठे, विनोद वणवे, डॉ. श्रीकांत बडग, अनिता डेंगळे यांचा या नाटय़कृतीत सहभाग असून, संजय ठाकूरनं या नाटय़कृतीचं दिग्दर्शन आणि प्रकाशयोजना केली आहे. तर मयूर मुळेनं संगीत आणि गोपाळ तिवारीनं गीतलेखन आणि वाद्यवादनाची जबाबदारी निभावली आहे.

‘लेखक बालाजी सुतार आणि मी दोघेही आंबेजोगाईचे. पण आम्ही एकमेकांना ओळखत नव्हतो. एका मित्रामुळे त्यांच्या लेखनाविषयी कळलं. उत्सुकता वाटल्यानं त्यांचं लेखन शोधून वाचलं. त्यानंतर मला प्रकर्षांनं त्यांच्या लेखनातला जिवंतपणा जाणवला. त्यामुळे त्यांच्याशी बोललो. त्यांच्या लेखनावर आधारित अभिवाचनाचा प्रयोग आम्ही २०१६ मध्ये पहिल्यांदा केला. त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. पण पुढे त्याचे प्रयोग करता आले नाही. पुन्हा बालाजी सुतारांशी बोलून आम्ही नव्याने काही लिहून घेतलं आणि त्यातून हा प्रयोग साकारला. त्याच्या सादरीकरणाचा आकृतिबंध कसा ठेवावा याचाही खूप विचार केला. पण नाटय़प्रसंग आणि गीतं यांतून मांडणी करण्याचं आम्ही ठरवलं. त्यामुळे हा प्रयोग म्हणजे रूढार्थाने नाटक नाही. पण आजच्या बदलत्या गावाचं दर्शन ‘गावकथा’तून घडवण्याचा प्रयत्न आहे,’ असं दिग्दर्शक संजय ठाकूरनं सांगितलं.