जंगलीमहाराज रस्त्यावर चारचाकी वाहन चालकांकडून बेकायदेशीररीत्या पार्किंग शुल्क वसूल केले जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. संभाजी उद्यानात बहुमजली यांत्रिक पार्किंग चालविणारा ठेकेदारच रस्त्यावर लावलेल्या वाहन चालकांकडून प्रतितास पाच रुपये या दराने शुल्क वसूल करून वाहन चालकांची लूट करत आहे.
महापालिकेच्यावतीने जंगलीमहाराज रस्त्यावर चारचाकी वाहनांकडून पार्किंगचे शुल्क वसूल करण्यासाठी दिलेला ठेका १ एप्रिल २०१५ रोजी संपुष्टात आला आहे. त्यानंतर महापालिकेने जंगलीमहाराज रस्त्यावरील पार्किंग नि:शुल्क असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार काही दिवस चारचाकी वाहन चालकांना पार्किंग नि:शुल्क उपलब्ध झाले होते. मात्र बहुमजली यांत्रिक वाहतळाचा ठेका घेतलेल्या ठेकेदाराने परस्पर रस्त्यावर लावलेल्या वाहन चालकांकडूनही पसे वसूल करायला सुरुवात केल्याची वस्तुस्थिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रशांत कनोजिया यांनी पुराव्यानिशी सिद्ध केली आहे. या ठेकेदाराविरुद्ध अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे. महापालिकेच्या बहुमजली वाहनतळाचा वापर एका खासगी शोरूम चालकाची वाहने लावण्यासाठी केल्याप्रकरणी या ठेकेदारावर कारवाई करून बकोरिया यांनी वाहनतळाला सील लावले होते. या पाश्र्वभूमीवर वाहन चालकांकडून बेकायदेशीररीत्या शुल्क वसुली केली जात असल्याची तक्रार करण्यात आली आहे.
जंगली महाराज रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी महापालिकेने कोटयवधी रुपये खर्च करून बहुमजली यांत्रिक वाहनतळ उभारला आहे. हा वाहनतळ खासगी ठेकेदाराला चालवण्यास देण्यात आला असून वाहनतळाची योग्यरीत्या देखभाल व्हावी यासाठी ठेकेदाराला पालिकेकडून निधीही दिला जातो. याच ठेकेदाराकडून नियमबाहय पद्धतीने रस्त्यावरील वाहन चालकांकडूनही पार्किंगचे शुल्क वसुली केले जात असल्याची कनोजिया यांची तक्रार आहे.