पुणे : कात्रज-कोंढवा रस्त्याच्या रुंदीकरणासाठी आवश्यक असलेली जागा ताब्यात घेण्यासाठी महापालिकेने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे ४७० कोटी रुपयांचा निधी जमा केला आहे. यामुळे या रस्त्याच्या कामाला गती मिळणार आहे. रस्त्याच्या पहिल्या टप्प्यात ५० मीटर रुंदीच्या रस्त्याचे भूसंपादन करण्यासाठी महापालिकेने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निधी जमा केला आहे.
कात्रज-कोंढवा रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी रुंदीकरणाचे काम महापालिकेने हाती घेतले आहे. हा रस्ता रुंद करण्यासाठी या भागातील काही खासगी जागा ताब्यात घ्याव्या लागणार आहे. जागा ताब्यात घेताना संबंधित जागामालकाला रोख रकमेच्या स्वरुपात भरपाई द्यावी लागणार आहे. या रस्त्याच्या कामाला ३१ ऑक्टोबर २०१८ मध्ये मान्यता मिळालेली आहे.
रस्त्याची रुंदी ८४ ऐवजी ५० मीटर करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. रस्त्याची रुंदी कमी केल्याने भूसंपादनासाठी होणारा खर्च कमी झाला आहे. यापैकी राज्य सरकारकडून १४० काेटी रुपयांचा निधी महापालिकेच्या तिजाेरीत जमा झाला असून, निधीचे जागामालकांना वाटप केले जाणार आहे. ५० मीटर रुंदीसाठी ९४ हजार चौरस मीटर जागेचे भूसंपादन करणे आवश्यक आहे. त्यापैकी ४६ हजार ४५६ चौरस मीटर जागेचे भूसंपादन झाले आहेत.
शहरातील प्रमुख प्रकल्पांच्या आढाव्यासाठी आयुक्त नवल किशोर राम यांनी स्वतंत्र कक्ष तयार केला आहे.
‘या रस्त्याच्या भूसंपादनासाठी आवश्यक असणारी ४७० कोटी रुपयांचा निधी महापालिकेने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जमा केला आहे. या निधीतून संबधित जागा मालकांना नुकसानभरपाई दिली जाणार आहे,’ असे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी सांगितले. दरम्यान, कात्रज कोंढवा रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी रस्ता रुंद करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.
या रस्त्याचे रुंदीकरण व्हावे यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. मात्र रस्त्याच्या रुंदीकरणांमध्ये अनेक खाजगी जागा मालकांच्या जागा ताब्यात घेणे आवश्यक असल्याने योग्य तो मोबदला दिल्यानंतरच जागा देण्याची तयारी जागा मालकांनी दाखविली आहे. महापालिका प्रशासन यासाठी प्रयत्न करत आहे. काही जागा मालक रस्ता करण्यासाठी जागा देण्याची तयारी दाखवतात मात्र प्रत्यक्षात बोलणी करण्याची वेळ आल्यानंतर माघार घेत विरोध करतात. त्यामुळे रस्ता रुंदीकरणाचे काम आराखड्यात असल्याचे महापालिका प्रशासनातील अधिकाऱ्यांनी सांगितले.