पिंपरी : महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागामार्फत शहरातील मृत जनावरे उचलणे, त्याची विल्हेवाट लावण्याचे काम दिल्लीवाला अँड सन्स या संस्थेमार्फत केले जात होते. कामाच्या पावत्यांमध्ये फेरफार करीत एक लाख २२ हजारांचा आर्थिक अपहार केल्याने संस्थेला काळ्या यादीत टाकण्यात आले. तसेच संस्थाचालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

हेही वाचा >>> Pune Crime Review : शहरबात : पुण्यात कधीही काहीही घडू शकते…

मृत जनावरे लोकवस्तीपासून दूर असलेल्या मोकळ्या जागेत दफन केली जातात. एमआयडीसी, भोसरीतील गवळीमाथा येथील जे ब्लॉक या ठिकाणी जनावरांचे दफन करण्यात येत होते. दरम्यानच्या काळात जनावरे दफन करण्यात येणारी जागा एमआयडीसीकडे हस्तांतरीत करण्यात आली. त्यानंतर पुणे महापालिकेच्या मान्यतेने नायडू पॉण्ड येथील दहन मशिनवर शहरातील जनावरांचे दहन करण्यास सुरुवात झाली. मोठ्या मृत जनावरासाठी प्रत्येकी तीन हजार रुपये शुल्क दिले जात होते. ती रक्कम दिल्लीवाला अँड सन्समार्फत पुणे महापालिकेला दिली जात होती. दहन शुल्काच्या पावत्या पशुवैद्यकीय विभागाला सादर करण्यात येत होत्या.

हेही वाचा >>> Wayanad landslide : वायनाड येथील भूस्खलनाची कारणे काय? संशोधकांनी नोंदवले निरीक्षण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यासंदर्भात ॲड. मनीष कांबळे यांनी महापालिकेकडे तक्रार केली. त्यानुसार दहन शुल्काच्या पावत्या तपासल्या. पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या प्राप्त अहवालानुसार पावत्यांमध्ये दिल्लीवाला अँड सन्सने परस्पर फेरफार केल्याचे आढळून आले. संस्थेने सादर केलेल्या पावत्यांमध्ये आणि पुणे महापालिकेच्या दहन शुल्काच्या पावत्यांमध्ये एक लाख २२ हजारांचा फरक असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर आयुक्त शेखर सिंह यांच्या मान्यतेनंतर दिल्लीवाला अँड सन्स या संस्थेला काळ्या यादीत टाकण्यात आले आहे. तसेच या संस्थाचालकावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. दिल्लीवाला अँड सन्स या संस्थेला तीन वेळा नोटीस दिली. संस्थेने समाधानकारक खुलासा केला नाही. त्यामुळे या संस्थेचे कामकाज थांबवून काळ्या यादीत नाव समाविष्ट केल्याचे पशुवैद्यकीय विभागाचे उपायुक्त संदीप खोत यांनी सांगितले.