पुणे : बेकायदा पद्धतीने सर्रासपणे उभारण्यात येणारे जाहिरात फलक, अनेक रस्त्यांवर पडत असलेला कचरा यामुळे शहरात सतत अस्वच्छता पसरलेली असते. शहर स्वच्छ ठेवण्यासाठी यापूर्वी देखील अनेकदा सूचना देऊनही त्याकडे होत असलेले दुर्लक्ष याबाबत महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी नाराजी व्यक्त केली. घनकचरा विभागासह शहर अस्वच्छ होण्यास कारणीभूत ठरणाऱ्या विभागांच्या प्रमुखांची कानउघडणी केली.
शहर पूर्णपणे स्वच्छ राहील, नागरिकांना चांगल्या सुविधा मिळतील याबाबत काळजी घ्या, अशा सूचना महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी अधिकाऱ्यांना केल्या. शहरात उभारण्यात येत असलेले अनधिकृत जाहिरात फलक, रात्रीच्यावेळी रस्त्यांवर टाकला जाणारा कचरा, याचा आढावा घेत महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी शहरातील विविध भागांत जाऊन पाहणी केली.
त्यावेळी त्यांना हे प्रश्न कायम असल्याचे दिसले. त्यानंतर नाराजी व्यक्त करत त्यांनी शहर पूर्णतः स्वच्छ राहील, नागरिकांना चांगल्या सुविधा मिळतील याबाबत सतर्क राहण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना केल्या. रात्रीच्यावेळी शहर स्वच्छ करण्याचे आदेशही त्यांनी दिले.
पुणे स्टेशन, कसबा पेठ, शनिवारवाडा, विद्यापीठ चौकांसह, औंध, बाणेर,बालेवाडी, पाषाण, डेक्कन या भागाची आयुक्तांनी पाहणी केली. पावसात पाणी साठणारी ठिकाणे, रस्त्यावरील राडारोडा, अनावश्यक पडलेले ड्रेनेज व पाणीपुरवठ्याचे पाईप तातडीने उचलण्यात यावेत. नागरिक रस्त्यावर कचरा टाकणार नाहीत, यासाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने करण्यासही आयुक्तांनी महापालिकेतील अधिकाऱ्यांना बजाविले.
महापालिकेतील विभागप्रमुखांनी कामाची जबाबदारी दुसऱ्या विभागांवर न ढकलता सामूहिक पद्धतीने काम करावे. सामूहिक जबाबदारीचे काम केल्याशिवाय शहराचा चेहरा बदलणार नाही. त्यामुळे प्रत्येकाने आपली जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडावी. – नवल किशोर राम, आयुक्त, पुणे महापालिका