महापालिकेतील बांधकाम परवानगी या खात्याचा संपूर्ण कार्यभार नगर अभियंता प्रशांत वाघमारे यांच्याकडे देण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला असून त्यांच्याकडे पुणे शहरासह तेवीस गावांतील बांधकाम परवानगीचे अधिकार सुपूर्द करण्यात आले आहेत. शहरातील बांधकाम परवानगीचा कार्यभार आतापर्यंत अतिरिक्त नगर अभियंता विवेक खरवडकर यांच्याकडे होता. त्यांच्याकडे आता पथ विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे.
महापालिकेचे तत्कालीन आयुक्त महेश पाठक यांनी वाघमारे आणि खरवडकर यांच्यात बांधकाम परवानगी संबंधीच्या कामांचे विकेंद्रीकरण केले होते. त्यानुसार खरवडकर यांच्याकडे तेवीस गावांतील बांधकाम परवानगीचे आणि वाघमारे यांच्याकडे जुन्या हद्दीतील बांधकाम परवानगीचे अधिकार होते. बांधकाम परवानगीचे सर्वाधिकार वाघमारे यांच्याकडे देण्यात येणार असल्यासंबंधी गेले तीन-चार दिवस महापालिकेत चर्चा होती. महापालिका आयुक्त विकास देशमुख यांनी तसे आदेश शुक्रवारी काढले.
या आदेशानुसार शहरासह समाविष्ट गावांमधील बांधकाम परवानगीचे अधिकार वाघमारे यांना देण्यात आले आहेत. तसेच भवन रचना विभागाचाही कार्यभार त्यांना देण्यात आला असून विकास आराखडा विभागही वाघमारे यांच्याकडे राहील. खरवडकर यांच्याकडे पथ विभाग आणि बीआरटीचा कार्यभार देण्यात आला आहे. नव्या आदेशानुसार पाणीपुरवठा आणि प्रकल्प हे विभाग अधीक्षक अभियंता व्ही. जी. कुलकर्णी यांच्याकडे राहतील, तर मलनिस्सारण विभागाचा पूर्ण कार्यभार अधीक्षक अभियंता मदन आढारी यांच्याकडे देण्यात आला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 27th Jul 2014 रोजी प्रकाशित
तेवीस गावांतील बांधकाम परवानगी; अधिकार प्रशांत वाघमारे यांच्याकडे
शहरासह समाविष्ट गावांमधील बांधकाम परवानगीचे अधिकार वाघमारे यांना देण्यात आले आहेत. तसेच भवन रचना विभागाच्या कार्यभारासह विकास आराखडा विभागही वाघमारे यांच्याकडे राहील.

First published on: 27-07-2014 at 03:25 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pmc construction authority newly merged 23 villages