राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेतील आमदार अनिल भोसले यांच्या पत्नी आणि भाजपमध्ये ‘तत्काळ’मध्ये प्रवेश करून (PMC Election 2017 ) पुणे महापालिका निवडणुकीत उमेदवारी मिळवलेल्या रेश्मा भोसले यांना आता अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवावी लागणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाने रेश्मा भोसले यांना अपक्ष निवडणूक लढवण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे पुण्यात भाजपला मोठा धक्का बसला असल्याचे मानले जाते. उच्च न्यायालयाने भोसले यांना अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याचे आदेश दिले असल्याचे महापालिकेच्या वकिलांनी दूरध्वनीद्वारे सांगितले आहे. त्यानुसार पुढील निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे महापालिका निवडणुकीसाठी रेश्मा भोसले यांना राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी नाकारल्याने त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर भाजपने त्यांना उमेदवारीही दिली होती. त्यांच्या उमेदवारीवरून अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या होत्या. त्याचदरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने आज रेश्मा भोसले यांना अपक्ष निवडणूक लढवण्याचे आदेश दिले आहेत. तसे आदेश रेश्मा भोसले यांना प्राप्तही झाले आहेत, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली. दरम्यान भोसले यांना आता अपक्ष निवडणूक लढवावी लागणार असून, भाजपसाठी हा मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे.

तत्पूर्वी, रेश्मा भोसले यांच्या भाजपकडून मिळालेल्या उमेदवारीवरून अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या होत्या. रेश्मा भोसले या भाजपच्या ‘कमळ’ चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याचे सोमवारी स्पष्ट झाले होते. निवडणूक आयोगाने तसा निर्णय दिला होता. महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी नाकारल्यानंतर रेश्मा भोसले यांना एका तासात भारतीय जनता पक्षाची उमेदवारी देण्यात आली होती. प्रभाग क्रमांक सात मधून ‘ड’ या खुल्या गटातून त्यांनी भाजपकडून अर्ज दाखल केला होता. तत्पूर्वी या जागेवरून सतीश बहिरट यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली होती. पण भोसले यांना ‘बी’ फॉर्म देण्यात आल्यामुळे त्या पक्षाच्या अधिकृत उमेदवार ठरल्या होत्या. या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरताना तो राष्ट्रवादी काँग्रेसच्या नावाने असल्याचे आणि भाजपचा बी फॉर्म असल्याचे पुढे आले होते. त्यामुळे घोले रस्ता क्षेत्रीय कार्यालयाच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी भोसले या भाजपच्या उमेदवार नाहीत, असे जाहीर केले होते. त्यानंतर अनेक नाट्यमय घटना दोन दिवसांच्या कालावधीत घडल्या होत्या. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी हा निर्णय दिल्यानंतर त्यांनी आयुक्तांना पत्र पाठविले होते. त्यावर आयुक्तांनी राज्य निवडणूक आयोगाकडे मार्गदर्शन मिळावे, अशी विनंती केली होती. त्यावर राज्य निवडणूक आयोगाच्या सचिवांपुढे भोसले यांनी दिलेल्या कागदपत्रांची पडताळणी झाली. त्यावर सुनावणी होऊन त्या भाजपच्याच उमेदवार असतील, असे आयोगाकडून जाहीर करण्यात आले होते. त्यानंतर महापालिका प्रशासनाकडूनही तशी यादी जाहीर करण्यात आली होती. त्यामुळे भोसले या भाजपच्या कमळ या चिन्हावरच लढणार असल्यावरही शिक्कामोर्तब झाले होते. भोसले अपक्ष लढणार की कमळ चिन्हावर लढणार या वादावर पडदा पडल्याचे चित्र असताना मुंबई उच्च न्यायालयाने भोसले यांना अपक्ष निवडणूक लढवण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाच्या आदेशामुळे भोसले यांना अपक्ष निवडणूक लढवावी लागणार आहे, हे स्पष्ट झाले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pmc election 2017 bjps reshma bhosale contest independent candidate in pmc polls
First published on: 08-02-2017 at 17:29 IST