पुणे : बालगंधर्व रंगमंदिराच्या पार्किंगमध्ये एका हॉटेलमधील ग्राहकांच्या गाड्या लावल्या जात असल्याचा आरोप करणारी एक चित्रफित प्रसारित झाल्यानंतर त्याची चर्चा सुरू झाली. या प्रकारानंतर हे पार्किंग ज्या ठेकेदाराला चालविण्यासाठी दिले आहे, त्याला पुणे महापालिकेने ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली असून तातडीने खुलासा मागविला आहे.
शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या बालगंधर्व रंगमंदिरामध्ये नेहमी असते. विविध नाटकांचे प्रयोग, संगीताचे कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम यासह सामाजिक तसेच राजकीय कार्यक्रम येथे होत असतात. सर्व दृष्टीने ये जा करण्यासाठी बालगंधर्व रंगमंदिर सोईस्कर असल्याने या ठिकाणी कार्यक्रम घेण्यासाठी आयोजक प्रयत्नशील असतात. बालगंधर्व रंगमंदिराच्या आवारामध्येच पुणे महापालिकेचे कलादालन देखील आहे. यामध्येही नवोदित कलाकारांपासून ख्यातनाम कलाकारांची प्रदर्शने भरविली जातात.
बालगंधर्व मध्ये कार्यक्रमासाठी येणाऱ्या रसिकांना वाहने उभी करता यावीत यासाठी जागा देखील येथे उपलब्ध आहे. काही वर्षांपूर्वी कार्यक्रमासाठी आलेल्या नागरिकांकडून या परिसरात वाहने लावण्यासाठी कोणतेही शुल्क घेतले जात नव्हते. मोफत पार्किंग व्यवस्था येथे उपलब्ध करून दिली जात होती. मात्र गेल्या काही महिन्यांपासून येथे वाहने लावणाऱ्यांकडून पार्किंगचे शुल्क घेतले जात आहे.
‘बालगंधर्व’च्या पार्किंगचा ठेका पुणे महापालिकेकडून एका खासगी बांधकाम व्यावसायिकाला देण्यात आला आहे. त्यामुळे तेथे पार्किंगसाठी शुल्कही आकारले जाते. हे पार्किंग प्रामुख्याने रंगमंदिरात येणाऱ्या प्रेक्षकांसाठी उपलब्ध असणे आवश्यक आहे. मात्र असे असतानाही अनेकदा कार्यक्रमासाठी आलेल्या नागरिकांना तसेच नाट्यसंस्थांचे पदाधिकारी, कलाकार यांना वाहने लावण्यासाठी जागाच मिळत नाही. याच्या तक्रारी देखील यापूर्वी काही नागरिकांनी महापालिकेकडे केल्या होत्या. मात्र त्याची कोणतीही दखल घेण्यात आली नाही.
दरम्यान, बालगंधर्व रंग मंदिराच्या पार्किंग मध्ये घोले रस्त्यावर असलेल्या एका प्रसिद्ध हॉटेल मधील ग्राहकांची वाहने आणून लावली जात असल्याचे समोर आले आहे. याची चित्रपट समाज माध्यमांवर प्रसिद्ध झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी तातडीने त्याची दखल घेऊन कारवाईच्या सूचना दिल्या. महापालिका आयुक्तांच्या सूचनेनंतर सांस्कृतिक विभागाचे उपायुक्त सुनील बल्लाळ यांनी पार्किंगचा ठेका असलेल्या संबधित ठेकेदाराला कारणे दाखवा नोटीस बजावली. ‘बालगंधर्व’चे पार्किंग ठेकेदाराला चालविण्यासाठी दिल्यावर आता तेथे हॉटेलचे पार्किंग होत असल्याचे चित्रफितीतून दिसते. त्यामुळे संबंधितांना पालिकेने नोटीस दिली आहे. यावर समाधानकारक खुलासा न आल्यास त्यांचा ठेका रद्द होईल,’ असे बल्लाळ यांनी सांगितले.