पुणे : संगमवाडीवरून येरवडा, लोहगाव विमानतळ तसेच विश्रांतवाडीकडे जाताना होणारी वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी महापालिकेने बिंदूमाधव ठाकरे चौकात उड्डाणपूल तसेच ग्रेड सेपरेटर उभारण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील अडीच वर्षांत ही दोन्ही कामे पूर्ण करण्याचा महापालिकेचा प्रयत्न असून, यासाठी आवश्यक निधी उपलब्ध नसल्याने या कामांसाठी खर्चाचे दायित्व ७२ (ब) अंतर्गत महापालिकेने घेतले आहे. स्थायी समितीच्या बैठकीत या प्रस्तावाला मान्यता दिल्याने यातील अडचणी दूर झाल्या आहेत.

शहराच्या पूर्व भागातून जुन्या मुंबई पुणे महामार्गाकडे जाण्यासाठी तसेच शहराच्या मध्यवर्ती भागातून विमानतळ आणि अहिल्यानगर रस्त्याकडे जाण्यासाठी प्रामुख्याने हा रस्ता वापरण्यात येतो. विश्रांतवाडीकडे जाणारे वाहनचालकदेखील बिंदूमाधव ठाकरे चौकाचा वापर करतात. त्यामुळे संपूर्ण दिवसभर या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते.

या दोन्ही कामांसाठी सर्वसाधारण ११५ कोटी ७३ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित धरला आहे. महापालिकेच्या २०२५-२६ च्या अंदाजपत्रकात या कामासाठी केवळ ८ कोटींची तरतूद उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही तरतूद कमी असल्याने महापालिकेकडून या प्रकल्पाचे दायित्व स्वीकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे या पुलाचे तसेच ग्रेड सेपरेटरचे काम करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

असे आहेत प्रकल्प

– बंडगार्डन ते खडकीच्या दिशेने चार पदरी १५.६० मीटर रुंदीचा उड्डाणपूल असणार आहे. त्याची लांबी ६२० मीटर राहणार आहे. खडकीच्या दिशेने तो १३० मीटर, तर बंडगार्डनच्या दिशेने १५८ मीटर असेल. रॅम्पसह एकूण लांबी ९०८ मीटर असेल.

– चौकात उभारण्यात येणारा ग्रेड सेपरेटर संगमवाडी ते विमानतळ आणि संगमवाडी ते बंडगार्डनकडे जाणारा असणार आहे. संगमवाडी ते विमानतळ मार्गाचे अंतर २१० मीटर असणार असून, त्यातील ६० मीटर भाग पूर्णपणे बंदिस्त असणार आहे. बंडगार्डनकडे जाणारा मार्ग २८९ मीटर रूंद असून, त्याचा बंदिस्त भाग ८० मीटर असणार आहे. हे दोन्ही भुयारी मार्ग ७ मीटर रुंदीचे असणार आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संगमवाडी येथून येरवड्याकडे जाणाऱ्या बिंदूमाधव ठाकरे चौकातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी महापालिका तेथे उड्डाणपूल आणि ग्रेड सेपरेटर उभारणार आहे. पुढील अडीच वर्षांत हे काम पूर्ण करायचे असल्याने ७२ ब अंतर्गत दायित्व स्वीकारण्याचा प्रस्ताव स्थायी समितीने मान्य केला आहे. – दिनकर गोजारे, मुख्य अभियंता, प्रकल्प विभाग