पुणे : महापालिकेच्या विविध विभागांची परवानगी न घेता पुणे महानगर परिवहन महामंडळाची (पीएमपी) बसस्थानके उभारणाऱ्या ठेकेदाराविरूद्ध दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला असून, त्याच्याकडून तिप्पट दंड वसूल केला जाणार आहे. संबंधित ठेकेदाराकडून उभारण्यात येणाऱ्या बस थांब्यांचे काम थांबविण्यात आले असून शहरात किती ठिकाणी बस थांबे उभारण्यात आली आहेत, त्याचे सर्वेक्षण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

महापालिकेचा पथ विभाग हे सर्वेक्षण करणार असल्याचे पथ विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी सांगितले. पुणे शहरासह पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीत बस थांबे उभारण्यासाठी पीएमपीने निविदा प्रक्रिया राबविली होती. त्यानुसार एका ठेकेदाराला हे काम देण्यात आले होते.

बस थांबे उभारताना संबधित ठेकेदाराला महापालिकेच्या पथ विभागासह विद्युत तसेच इतर कोणत्याही विभागाची परवानगी न घेता परस्पर रस्ते खोदून बस थांबे उभारल्याचा प्रकार समोर आला होता. या प्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस हेमंत संभूस यांनी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांची भेट घेत त्यांना ठेकेदारावर कारवाई करण्याबाबत निवेदन दिले होते.

याबाबत महापालिकेच्या पथ विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर म्हणाले, ‘संबधित ठेकेदाराने पथ विभागाची कोणतीही परवानगी न घेता रस्ते खोदाई केल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे त्याच्याकडून तिप्पट दंड वसूल केला जाणार आहे. तसेच शहरातील ज्या भागात ठेकेदाराने बस थांबे उभारताना महापालिकेकडून परवानगी घेतली नाही, त्याची शहानिशा करण्यासाठी सर्वेक्षण सुरु करण्यात आले आहे. त्याचा अहवाल महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडे सादर केला जाईल, त्यानंतर पुढील कारवाई केली जाईल.’

पीएमपी आणि बस थांबे उभारणाऱ्या ठेकेदार कंपनीमध्ये करार झाला हाेता. या करारानुसार या ठेकेदाराने बस थांबे उभे करण्यासाठी महापालिकेच्या पथ विभाग, आकाशचिन्ह विभाग तसेच इतर विभागाकडून परवानगी घेणे आवश्यक हाेते. त्यासाठी होणाऱ्या खोदाईचे शुल्क संबंधित विभागांकडे भरणे गरजेचे हाेते. मात्र, या कंपनीने महापालिकेच्या कोणत्याही विभागाची परवानगी घेतली नसल्याची माहिती संभूस यांना महापालिकेने दिली आहे. त्यानंतर संभूस यांनी पत्रकार परिषद घेत संबधित ठेकेदारावर कारवाई करुन त्याच्याकडून शुल्क घ्यावे, अशी मागणी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांची भेट घेऊन केली होती.