पुणे महापालिकेतर्फे सीएसआर संकेतस्थळ तयार करण्यात आले असून त्याचे उद्घाटन बुधवारी (१२ नोव्हेंबर) होत आहे. समाजातील सर्व लाभार्थीना समान आणि गुणवत्तापूर्ण सेवा मिळावी यासाठी पारदर्शी यंत्रणा उभी करणे आणि विकासामध्ये कंपन्यांना, संस्थांना सहभागी करून घेणे हा या योजनेचा उद्देश आहे. श्यामची आई फाऊंडेशनच्या सहकार्याने ही योजना राबवण्यात येणार असून सीएसआरसाठी संकेतस्थळ तयार करणारी पुणे ही पहिली महापालिका आहे.
महापौर दत्ता धनकवडे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. आयुक्त कुणाल कुमार आणि अन्य पदाधिकारी व अधिकारीही यावेळी उपस्थित होते. कंपन्यांच्या सामाजिक जबाबदारी (कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी-सीएसआर) अंतर्गत कंपन्यांनी समाजातील वंचित घटकांसाठी काही निधी उपलब्ध करून देणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यानुसार इच्छुक कंपन्या या संकेतस्थळावरील माहितीनुसार श्यामची आई फाऊंडेशन तसेच महापालिकेशी संपर्क करतील आणि महापालिका शाळांच्या गुणवत्ता सुधारणेसाठी विविध आवश्यक सेवा-सुविधा उपलब्ध करून देतील, असे सांगण्यात आले. या योजनेत कोणताही निधी स्वीकारला जाणार नाही. इच्छुक कंपन्या महापालिकेबरोबर विहित नमुन्यात करार करतील व पालिका शाळांमध्ये स्वखर्चाने सेवा पुरवतील तसेच त्यांची देखभालही करतील.
या संकेतस्थळावर महापालिकेच्या सर्व शाळा इमारतींची नावे, पत्ते, इमारतीत चालणाऱ्या शाळा ही माहिती असेल. शाळांना आवश्यकतेप्रमाणे स्वच्छतागृह, पाणी, वर्गखोल्या, इमारत, शिक्षक प्रशिक्षण, ग्रंथालय, प्रयोगशाळा, इमारतीचे सुशोभीकरण यासाठी सीएसआर अंतर्गत उपलब्ध होणाऱ्या निधीतून सुविधांची पूर्तती केली जाईल. पालिकेच्या तीनशे चाळीस शाळांची गरजांवर आधारित माहिती संकलित करण्यात आली आहे. ही माहिती संकेतस्थळावर उपलब्ध असेल.
शिक्षण, उद्यान आदी विविध विभागांची माहिती संकलित करण्यात आली असून सीएसआर अंतर्गत कोणती कामे करता येतील हे निश्चित करण्यासाठी प्रत्येक विभागाची स्वतंत्र समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीची दर तीन महिन्यांनी बैठक होईल तसेच कोणत्या सुविधा सीएसआर अंतर्गत घ्यायच्या हे समिती निश्चित करेल. या संकेतस्थळाचे उद्घाटन बुधवारी सकाळी अकरा वाजता होत असून सहकारनगरमधील राजीव गांधी ई-लर्निग स्कूल हा कार्यक्रम होणार आहे.