पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) मालकीच्या बस बंद पडल्यास देखभाल दुरुस्ती अभियंता आणि चालक यांची अर्ध्या दिवसाची वेतन कपात केली जाणार आहे. पीएमपीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक पंकज देवरे यांनी याबाबतचा आदेश दिला आहे. हा निर्णय ‘पीएमपी’च्या मालकीच्याच बससाठी घेण्यात आला असून, ठेकेदारांच्या बसबाबत उल्लेख नसल्याने कामगार संघटनेने विरोध केला आहे. त्यामुळे देवरे यांचा आणखी एक निर्णय वादग्रस्त ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

पीएमपीच्या ताफ्यात स्वमालकीच्या ९६४, तर कंत्राटी १०१९ अशा मिळूण एकूण १९८३ ‘पीएमपी’च्या आहेत. त्यापैकी स्व:मालकीच्या ७३७ बसची वेगवेगळ्या आगारांमध्ये दुरुस्ती सुरू आहे. त्यामध्ये तांत्रिक दुरुस्ती, मार्गिकेवर अचानक बंद पडणे, बिघाड यांमुळे फेऱ्या रद्द करण्यात येत आहेत. त्याचा फटका पीएमपीच्या उत्पन्नावर होत आहे. हे प्रमाण कमी करून प्रवाशांना दर्जेदार सेवा देण्यासाठी बस बंद पडण्याच्या घटनांबाबत दखल घेण्यात आली आहे. त्यानुसार देखभाल दुरुस्ती विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी देवरे यांनी सूचना केल्या आहेत.

‘ब्रेकडाऊन’ संदर्भातील उपाययोजना म्हणून बस संचलनात पाठविण्यापूर्वी विभागीय देखभाल दुरुस्ती अभियंता यांनी दुरुस्तीच्या कामांची पूर्तता झाली आहे किंवा नाही याची खात्री करावी. चालकानेही पडताळणी करून बस मार्गावर न्यावी. संचलनादरम्यान बस बंद पडल्यास अभियंता आणि चालक यांच्या वेतनातून अर्ध्या दिवसाची वेतन कपात केली जाईल, असे देवरे यांनी आदेशात नमूद केले आहे. हा निर्णय पीएमपीच्या ताफ्यातील स्व:मालकीच्या ७३७ बससाठी आहे. कंत्राटदारांच्या पीएमपीबाबत उल्लेख नाही. त्यामुळे कर्मचारी संघटनांनी विरोध केला आहे.

संचलनातील बस बंद पडणे ही तांत्रिक बाब आहे. एखादी गाडी दुरुस्ती करूनही बंद पडली, तरी नियमानुसार प्राथमिक चौकशी होणे अपेक्षित आहे. चौकशीअंती कारवाई केल्यास हरकत नाही. या निर्णयातून ठेकेदारांच्या चालकांना अभय देण्यात आले आहे. त्यामुळे या निर्णयाला विरोध आहे.- सुनील नलावडे,सरचिटणीस, पीएमपी राष्ट्रवादी महाराष्ट्र जनरल कामगार संघटना