दैनंदिन प्रवासी संख्येबरोबरच उत्पन्नात लक्षणीय वाढ

पुणे : करोना संसर्गामुळे मर्यादित असलेली पीएमपीची सेवा पूर्वपदावर आली आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील विविध मार्गावर एकूण १ हजार ५०० गाडय़ांद्वारे पीएमपीची सेवा सुरू असून दैनंदिन प्रवासी संख्येनेही आठ लाखांचा टप्पा ओलांडला आहे. त्यामुळे उत्पन्नातही वाढ होऊन दैनंदिन उत्पन्न सरासरी १ कोटी ३५ लाख एवढे मिळत आहे.

करोना संसर्गामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील पीएमपीची सेवा मार्च २०२० पासून टाळेबंदीमुळे बंद ठेवण्यात आली होती. त्यानंतर सप्टेंबर २०२० पासून बससेवा टप्प्याटप्याने सुरू करण्यात आली. सेवा मर्यादित मार्गावर असल्याने दैनंदिन प्रवासी संख्या आणि दैनंदिन उत्पन्न मिळविण्यासाठी पीएमपीकडून प्रयत्न सुरू झाले होते. टाळेबंदीपूर्वी सेवेत असलेली रातराणी, पुणे दर्शन आणि महिलांसाठीची खास तेजस्विनी बससेवा पीएमपीकडून पूर्ववत करण्यात आली. सध्या पुणे, पिंपरी-चिंचवड शहरासह पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) तसेच ग्रामीण भागतही प्रवाशांच्या मागणीनुसार सेवेचे विस्तारीकरण करण्यात आले आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील सेवा पूर्ववत करताना जुने मार्ग पुन्हा सुरू करण्यात आले आहेत. त्यामुळे दैनंदिन प्रवासी संख्याही वाढली आहे. 

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील दैनंदिन किमान दहा लाख प्रवाशांची प्रमुख सार्वजनिक सेवा असलेल्या पीएमपीतून सध्या दैनंदिन ८ लाख प्रवासी प्रवास करत आहेत. त्यामुळे दैनंदिन उत्पन्नही सरासरी १ कोटी ३५ लाख रुपयांपर्यंत पोहोचले आहे. शहरातील महाविद्यालये सुरू झाली आहेत. अद्याप शाळा बंद आहेत,मात्र अन्य व्यवहार खुले झाल्याने पीएमपीची सेवाही पूर्वपदावर येत आहे, अशी माहिती पीएमपीच्या वाहतूक विभागाकडून देण्यात आली. प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन येत्या काही दिवसांत ताफ्यातील सर्व गाडय़ा वापरात आणण्यात येतील तसेच मार्गाची फेररचना करण्याबरोबरच नव्याने मार्ग सुरू करण्याचे नियोजित असल्याचे पीएमपी प्रशासनाकडून सांगण्यात आले.