पुणे : हडपसर रेल्वे स्थानकातील प्रवाशांना शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा लाभ घेता यावा, दोन्ही यंत्रणेतील समन्वयामुळे प्रवाशांना दळणवळणाची सुविधा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने पुणे महानगर परिवहन महामंडळाचे (पीएमपीएमएल) प्रयत्न सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर हडपसर रेल्वे स्थानक परिसरात ‘पीएमपी’ला वाहनतळासाठी जागा उपलब्ध करू द्यावी म्हणून मंगळवारी रेल्वे प्रशासनाला प्रस्ताव देण्यात आला.

सद्य:स्थितीला हडपसर परिसरातून बसमार्ग क्रमांक १५६ गाडीतळ ते हडपसर रेल्वे स्थानक अशी ‘पीएमपी’ धावत आहेत. तर बसमार्ग कर्मांक १६०, १६८ आणि १६९ या मार्गांवरून पुढे जाणाऱ्या ‘पीएमपी’ला हडपसर रेल्वे थांबा देण्यात आला आहे. मात्र, अरुंद रस्ते, बाजारपेठ, दाट वस्तीचा भाग असल्याने ‘पीएमपी’ प्रवाशांना अडचणी येत आहेत. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून हडपसर रेल्वे स्थानकाच्या पुनर्बांधणीचे काम सुरू आहे. भविष्यात या मार्गावरून लांब पल्ल्याच्या गाड्या सोडण्याचे नियोजन असल्याने परिसरातील दळणवळण सुविधा अपुरी पडण्याची शक्यता लक्षात घेऊन ‘पीएमपी’ प्रशासनाने हडपसर रेल्वे स्थानकाच्या परिसरात पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.

त्यानुसार हडपसर रेल्वे स्थानकात ‘पीएमपी’साठी वाहनतळ उपलब्ध करून दिल्यास शहरातील विविध भागातून जलद वाहतूक होईल. रेल्वे प्रवाशांना सहज स्थानकावर आणि स्थानकावरून नियोजित ठिकाणापर्यंत जाण्यासाठी पीएमपी उपलब्ध होईल, असे प्रस्तावात नमूद केले आहे.

पाहणीनंतर रेल्वेला प्रस्ताव

पुणेकरांचा पीएमपी प्रवास आणखी सुलभ आणि सुसंगत करण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जात असताना ‘पीएमपी’च्या अध्यक्षा तथा व्यवस्थापकीय संचालक दीपा मुधोळ मुंडे यांनी मंगळवारी परिसराला प्रत्यक्ष भेट दिली. यावेळी पीएमपीचे मुख्य वाहतूक व्यवस्थापक सतीश गव्हाणे, हडपसर स्थानक प्रमुख समीर आतार, रेल्वे प्रशासनाचे विभागीय व्यवस्थापक संजय लोहात्रे आणि रेल्वे विभागाचे अनेक अधिकारी उपस्थित होते. पाहणी केल्यानंतर चर्चेअंती मुंडे यांनी रेल्वे प्रशासनाला प्रस्ताव दिला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हडपसर स्थानकावरून प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांसाठी थेट स्थानकापर्यंत पूरक सेवा उपलब्ध करून देण्याचा मानस आहे. त्यासाठी हडपसर रेल्वे स्थानकाच्या परिसरातच पीएमपीचे स्वतंत्र स्थानक निर्माण केल्यास प्रवाशांना शहरातील प्रमुख भागापर्यंत थेट बस सेवा सुरू करण्यात येईल. रेल्वे प्रशासनासोबत समन्वय साधून मार्ग काढण्यात येत आहे. – दीपा मुधोळ-मुंडे, अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल