पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) बेशिस्त बसचालक आणि वाहकांवर कारवाई करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असून, त्यायाबाबत सोमवारी परिपत्रक काढण्यात आले.
परिपत्रकात म्हटले आहे, ‘‘पीएमपीएमएल’च्या स्वत:च्या आणि कंत्राटी बसचालकांना बसमध्ये मोबाईल किंवा इतर इलेक्ट्राॅनिक उपकरणे वापरता येणार नाहीत. भरधाव बस चालविणाऱ्या चालकांवर नियंत्रण ठेवण्याबाबत सूचना करण्यात आली आहे. गैरवर्तणूक आढळल्यास चालक आणि वाहकांवर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
पुण्यात आयोजित एका कार्यक्रमात नागरिकांनी ‘पीएमपी’च्या अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक दीपा मुधोळ- मुंडे यांच्यावर प्रश्नांचा भडिमार केला होता. ‘पीएमपी’च्या तक्रार केंद्रावर ऑनलाईन अर्ज केल्यानंतरही कारवाई होत नसल्याचे मांडण्यात आले होते.
चालक-वाहकांसाठी या सूचना
- बस संचलन करताना मोबाईल किंवा इतर इलेक्ट्राॅनिक उपकरणांचा (हेडफोन) वापर करू नये
- मद्यपान किंवा धूम्रपान करू नये
- वाहतूक नियंत्रण दिवा (लाल) लागल्यास बस चिन्हांकित पट्ट्याच्या (झेब्रा क्रॉसिंग) मागे थांबवावी.
- मार्गिकेवरील बस थांब्यांवरच बस उभ्या कराव्यात
- मार्गिका शिस्तीचे पालन करावे
- बस भरधाव चालवू नये
कंत्राटी बसचालकांना सूचना
‘पीएमपी’कडे चार हजार ९२८ चालक आहेत. यापैकी दोन हजार ६८२ बसचालक पीएमपीचे, तर दोन हजार २४९ चालक हे कंत्राटी (ठेकेदार) आहेत. पीएमपी प्रशासनासह कंत्राटी चालकांनाही या सूचना लागू राहणार असल्याचे यावेळी ‘पीएमपी’तील अधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले.
बस वेगात चालविल्याने बसमधील प्रवाशांसह रस्त्यावरील नागरिकांना धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच, वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणे चुकीचे आहे. त्यामुळे शिस्त लावण्यासाठी कारवाईचा बडगा उगारणे महत्त्वाचे आहे.
दीपा मुधोळ – मुंडे, अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल