पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन विभागातील २६ जवानांना प्रत्यक्ष सराव अन् प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्यात आले. नैसर्गिक आपत्ती, पूरस्थितीच्या काळात जीव वाचवण्यासाठी केवळ पोहण्याचे कौशल्य पुरेसे नसते, तर योग्य तंत्र, अचूक प्रतिसाद आणि तत्काळ प्राथमिक उपचारांचीही गरज असते. बचाव तंत्रे आणि विविध पद्धतींचा सराव करून जवानांना कठीण परिस्थितीत प्रभावी बचावकार्य कसे करावे हे प्रशिक्षणात शिकवले.

वाहत्या पाण्यात पोहण्याच्या तंत्रांवर विशेष भर देण्यात आला. स्थिर पाण्यात पोहणे सोपे असले तरी जोरात वाहणाऱ्या प्रवाहात पोहणे अत्यंत अवघड असते. अनेकदा अशा प्रवाहात अडकलेल्या किंवा वाहून गेलेल्या नागरिकांना वाचवण्यासाठी जवानांना मोठी कसरत करावी लागते. म्हणूनच वेगाने वाहणाऱ्या प्रवाहात पोहण्याचे कौशल्य, जीवनरक्षक जॅकेटशिवाय पोहणे, तसेच वाहत्या पाण्यातून बोटींवर सुरक्षितपणे चढणे याचा सराव घेण्यात आला. याशिवाय कोणत्याही आपत्कालीन प्रसंगी त्वरित प्रतिसाद कसा द्यावा, हेही शिकवण्यात आले. केवळ बचावच नाही, तर बचावानंतरचे प्राथमिक उपचारही तितकेच महत्त्वाचे असतात. साहित्य उपलब्ध नसल्यास आजूबाजूच्या वस्तूंचा वापर करून मदत कशी करावी, पाण्यात फिट आल्यास कोणते उपाय करावेत, तसेच पाण्यात बुडालेल्या व्यक्तीला वाचवताना कोणत्या बाबींची काळजी घ्यावी, हे जवानांना शिकवण्यात आले.

सर्पदंश झाल्यावर काय करावे, जखमी व्यक्तीचा रक्तस्राव थांबवण्यासाठी दाब बिंदू (प्रेशर पॉइंट) वापर कसा करावा, पट्टी कशी बांधावी, याचेही प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. जखमींची सुरक्षित हालचाल कशी करावी, त्यांना कमीत कमी वेदना होतील याची काळजी घेत हातपाय पकडून कसे उचलावे, हेही जवानांना शिकवण्यात आले. रुग्णवाहिका येईपर्यंत कोणते उपचार करता येऊ शकतात, कोणती कृती तत्काळ जीव वाचवू शकते आणि कोणत्या गोष्टी करायच्या नाहीत याबाबतही वैज्ञानिक दृष्टिकोनातून मार्गदर्शन केले गेले. या सर्व प्रशिक्षणामुळे अग्निशमन जवानांची आपत्कालीन परिस्थितीत प्रतिसाद देण्याची क्षमता अधिक सक्षम होणार असून, भविष्यातील आपत्तीमध्ये नागरिकांचे प्राण वाचवण्यासाठी हे प्रशिक्षण मोलाचे ठरणार असल्याचे महापालिका प्रशासनाने सांगितले.

अग्निशमन दलाने नागरिकांच्या सुरक्षेसाठी आपत्ती व्यवस्थापनातील कौशल्य आत्मसात करणे ही काळाची गरज आहे. हे प्रशिक्षण जवानांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणारे आहे. वाहत्या पाण्यात बचावकार्य, प्राथमिक उपचार आणि आपत्कालीन प्रतिसाद यामधील त्यांची क्षमता निश्चित वाढली आहे, असा विश्वास अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील यांनी व्यक्त केला.

पूरस्थितीत केवळ शारीरिक ताकद पुरेशी नसते, तर त्वरित निर्णय घेण्याची तयारी असणेही गरजेचे आहे. या प्रशिक्षणामुळे आम्हाला अशा वेळी कसे शांत राहायचे, योग्य तंत्र वापरून नागरिकांना सुरक्षितपणे कसे वाचवायचे, हे शिकायला मिळाले. आता अशा परिस्थितीला आम्ही अधिक आत्मविश्वासाने सामोरे जाऊ शकतो, असे अग्निशमन अधिकारी पूजा वालगुडे यांनी सांगितले.