पुणे : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हद्दीतील नाल्यांच्या साफसफाईला गती देण्याची सूचना पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डाॅ. योगेश म्हसे यांनी दिली आहे. तसेच रस्त्यांची कामेही तातडीने करण्यात येणार असून, मोकळ्या जागांवर टाकलेला राडारोडा टाकणाऱ्यांवर आणि तो न उचलणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
मान्सूनपूर्व तयारीच्या अनुषंगाने डाॅ. योगेश म्हसे यांच्या अध्यक्षतेखाली आकुर्डी येथील कार्यालयात बैठक झाली. त्या वेळी संभाव्य आपत्कालीन परिस्थितीचा विचार करून पीएमआरडीए यंत्रणेचा आढावा घेण्यात आला.पीएमआरडीएचे अतिरिक्त महानगर आयुक्त दीपक सिंघला, पोलीस अधीक्षक तथा दक्षता अधिकारी अमोल तांबे, विकास परवानगी विभागाचे संचालक सुनील मरळे, मुख्य अभियंता रिनाज पठाण, मुख्य अग्निशामक अधिकारी देवेंद्र पोटफोडे, सहआयुक्त हिंमत खराडे, सह आयुक्त डाॅ. दीप्ती सूर्यवंशी-पाटील, सह महानियोजनकार श्वेता पाटील यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.
मान्सूनपूर्व रस्त्यांची कामे, त्यांची दुरुस्ती तातडीने करत मोकळ्या जागांवर टाकलेला राडारोडा न उचलणाऱ्या संबंधित जागामालकांवर कारवाई करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. पीएमआरडीएच्या हद्दीत सर्रास राडारोडा टाकला जात आहे. त्यामुळे जागामालकांनी तो तातडीने काढून घ्यावा, अशी सूचनाही करण्यात आली. आपत्ती प्रतिसाद पथकाला पूर, दरड कोसळणे यासह अन्य संभाव्य आपत्ती व्यवस्थापनासाठी सज्ज राहण्याची सूचना करण्यात आली. तसेच अर्बन ग्रोथ सेंटर भागातील नालेसफाई तातडीने करून नाल्यांच्या प्रवाहातील अडथळे दूर करण्यासंदर्भातही कार्यवाही करण्याचे या बैठकीत निश्चित करण्यात आल्याची माहिती डाॅ. म्हसे यांनी दिली.