पुणे : हिंजवडी परिसरातील एकोणीस किलोमीटर अंतरातील अतिक्रमणे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) काढण्यात आली असून या भागातील अरूंद रस्ते रूंद करण्याबरोबरच काही नवीन रस्तेही प्रस्तावित करण्यात आले आहेत. त्या अनुषंगाने तातडीने मोजणी आणि भूसंपादन प्रक्रियेचे प्रस्ताव पाठविण्याची सूचना पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डाॅ. योगेश म्हसे यांनी केली आहे.

हिंजवडीसह चाकण परिसरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी गेल्या महिन्याभरापासून विविध प्रशासकीय यंत्रणांच्या माध्यमातून उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने रस्ते रुंदीकरणासह परिसरातील अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणांवर कारवाई करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने सुरू असलेली विकासकामे आणि कारवाईसंदर्भात पीएमआरडीएचे महागनर आयुक्त डाॅ. योगेश म्हसे यांनी बुधवारी प्रशासकीय यंत्रणांकडून आढावा घेतला. त्यावेळी प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी दिले.

अतिरिक्त महानगर आयुक्त दीपक सिंगला, पोलीस अधीक्षक तथा दक्षता अधिकारी अमोल झेंडे, मुख्य अभियंता रिनाज पठाण, विकास परवानगी आणि नियोजन विभागाचे संचालक अविनाश पाटील, अनधिकृत बांधकाम विभागाच्या सह आयुक्त डॉ. दीप्ती सूर्यवंशी-पाटील, जमीन मालमत्ता विभागाचे सह आयुक्त हिम्मत खराडे यांच्यासह जलसंपदा विभाग, एमआयडीसी, एमएसईबी, एमपीसीबी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

हिंजवडी आणि चाकण भागातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आदेश दिले आहेत. या भागातील अरूंद रस्ते रूंद करण्यासाठी परिसरातील अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणे काढण्याची कारवाई पीएमआरडीएसह त्या-त्या स्थानिक यंत्रणांकडून करण्यात येत आहे. त्यानुसार हिंजवडी भागातील १९ किलोमीटर अंतरातील अतिक्रमणे काढण्यात आल्याची माहिती डाॅ. म्हसे यांनी दिली. तसेच रस्ते रूंद करम्यासाठी मोजणी आणि भूसंपादन प्रक्रियेचे प्रस्ताव तातडीने पाठविण्याची सूचनाही त्यांनी केली.

लक्ष्मी चौक ते मेझा-९ हाॅटेल, पांडवनगर ते माणगाव ते फेज-३, लक्ष्मी चौक ते मारूंजी ते कोलते पाटील गेट, लक्ष्मी चौक ते पद्मभूषण चौक ते विप्रो सर्कल, मधुबन हाॅटेल ते छत्रपती शिवाजी चौक, छत्रपती शिवाजी चौक ते एमआयडीसी हद्द, कासारसाई रस्ता, छत्रपती शिवाजी चौक ते हिंजवडी गावठाण (स्मशानभूमी रस्ता), प्राईड रस्ता ते विप्रो सर्कल, शिवाजी चौक ते पद्मभूषण चौकासह अन्य भागातील रस्ता रूंदीकरणासंदर्भातही या बैठकीत चर्चा करण्यात आली. माण, हिंजवडी, मारूंजी आदी भागातील वाहतूक कोंडी आणि नागरी समस्या निकाली काढण्यासाठी पर्यायी रस्त्यासंदर्भातील कामांचाही यावेळी आढावा घेण्यात आला.

चाकण भागातील वाहतूक सुरळीत करण्याला प्राधान्य

हिंजवडी भागातील अतिक्रममांवर कारवाई केल्यानंतर येत्या आठवडाभरात पीएमआरडीएसह अन्य प्रशासकीय यंत्रणा चाकण भागातील वाहतूक सुरू करण्यासंदर्भात उपाययोजना करणार आहेत. या भागातील अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणे काढण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. पुणे-नाशिक रस्ता, नाशिक फाटा ते राजगुरू नगर उन्नत मार्ग, चाकण-तळेगाव-शिक्रापूर, औद्योगिक क्षेत्रातील रस्त्यांवरील खड्डे आणि वाहतूक कोंडी, ट्रक टर्मिनल, चाकण भागातील बाह्यवळण रस्ते यासह अन्य रस्त्यांचा आढावाही या बैठकीत घेण्यात आला.