पुणे : हिंजवडी आणि परिसरातील वाहतूक कोंडी सोडविण्याच्या दृष्टीने पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) या भागातील सहा प्रमुख रस्त्यांच्या रुंदीकरणासाठी भूसंपादन प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. त्या दृष्टीने पीएमआरडीए आणि शेतकऱ्यांची बैठक झाली.

हिंजवडी परिसरात सातत्याने वाहतूककोंडी होत असून, हिंजवडी येथील राजीव गांधी आयटी पार्कमध्ये काम करणारे आयटीयन मोठ्या त्रासाला सामोरे जात आहेत. या पार्श्वभूमीवर परिसरातील वाहतूककोंडी सोडविण्याच्या दृष्टीने पीएमआरडीएकडून पावले उचलण्यास सुरुवात झाली आहे. त्यानुसार सहा प्रमुख रस्ते रुंदीकरणासाठी ‘पीएमआरडीए’च्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांसमवेत बैठक घेतली.

या बैठकीत रस्त्यांसाठी आवश्यक भूसंपादन प्रक्रियेची रूपरेषा आणि कार्यवाहीबाबत अधिकाऱ्यांनी संबंधित शेतकऱ्यांबरोबर धोरणात्मक चर्चा केली. ‘पीएमआरडीए’चे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी शेतकरी, व्यावसायिकांच्या अडचणी समजून घेत त्यांच्या शंकांचे निरसन केले. या बैठकीस अतिरिक्त महानगर आयुक्त दीपक सिंगला, मुख्य अभियंता रिनाज पठाण, अधीक्षक अभियंता शिवप्रसाद बागडी, परवानगी व नियोजन विभागाचे श्रीकांत प्रभुणे आदी अधिकारी उपस्थित होते.

हिंजवडीसह परिसरातील वाहतूककोंडी दूर करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. यात प्रामुख्याने रस्ते रुंदीकरणाच्या अनुषंगाने प्रक्रिया राबविण्यात येत असून, यासाठी लागणाऱ्या जमिनीचे संपादन संबंधित शेतकऱ्यांशी संवाद आणि समन्वय ठेवूनच करणार असल्याचे या वेळी स्पष्ट करण्यात आले.

अतिक्रमित रस्ते खुले करण्यास सुरुवात

राजीव गांधी आयटी पार्कच्या परिसरातील हिंजवडी, माण, मारुंजी भागातील नागरी समस्या आणि वाहतूककोंडी सोडविण्याच्या दृष्टीने ‘पीएमआरडीए’ने अतिक्रमित रस्ते खुले करण्यास सुरुवात केली आहे. यात प्रामुख्याने आयटी पार्क टप्पा दोन – विप्रो सर्कल ते मारुंजी लक्ष्मी चौक दरम्यानचा महत्त्वाचा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्याची प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडूनही सूचना

उपमुख्यंत्री अजित पवार यांच्याकडूनही पाहणीहिंजवडीतील राजीव गांधी आयटी पार्क परिसरातील नागरी समस्यांची कोंडी फोडण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गेल्या रविवारी पाहणी दौरा केला होता. . या पाहणीवेळी शासकीय यंत्रणांची झाडाझडती घेऊन आयटी पार्क परिसरातील समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी नवीन प्रकल्प मार्गी लावण्याचे सूचना त्यांनी दिली होती. रस्त्याच्या कामामध्ये येणाऱ्यांवर थेट कारवाई करा, असे आदेशही पवार यांनी दिले होते.