पुणे : ‘पाकिस्तानव्याप्त काश्मीर (पीओके) भारतात विलीन होणे गरजेचे आहे, तरच दहशतवादी कारवाया थांबतील. त्यासाठी पाकिस्तानने पुढाकार घेऊन संबंधित भूभाग भारताकडे विलीन करावा अन्यथा युद्ध अटळ आहे,’ असे मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी रविवारी पुण्यात व्यक्त केले. शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत आठवले बोलत होते. रिपब्लिकन पक्षाचे राज्य सचिव बाळासाहेब जानराव, प्रदेश संघटक सचिव परशुराम वाडेकर आणि इतर पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.
आठवले म्हणाले, ‘भारतात होणारे दहशतवादी हल्ले, कारवाया पाकव्याप्त काश्मीरमधूनच होत आहे. सातत्याने होणाऱ्या कारवाया पाकिस्तानमधूनच होत असल्याचे सिद्ध होत असल्याने, भारताकडून पाकिस्तानला ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून दाखवून दिले आहे. त्यामुळे पाकिस्तानने काश्मीरमधील व्यापलेला भूभाग (पीओके) भारताकडे सोपवावा आणि दहशतवादी कारवाया थांबवाव्यात, असा प्रस्ताव भारताने मांडला आहे.’
‘अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीनंतर युद्ध थांबले, असे सांगितले जात असले, तरी तसे नसून, भारताकडूनच युद्धविराम देण्यात आला आहे. भारताला कोणत्याही मध्यस्थाची गरज नाही,’ असे आठवले यांनी नमूद केले.
चौकट
‘…तर शरद पवार राष्ट्रपती असते’
‘उद्धव आणि राज ठाकरे पुन्हा एकदा एकत्र येण्याची शक्यता वाटत नाही. त्यांच्यात मतभेद आहेत. जर ते एकत्र आले, तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी (शरद पवार) राज ठाकरेंना महाविकास आघाडीमध्ये स्वीकारेल, याची शाश्वती नाही. तसेच, शरद पवार २०१४ मध्येच पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबर आले असते, तर आज ते राष्ट्रपती झाले असते,’ अशी टिप्पणी आठवले यांनी केली.
‘मुख्यमंत्र्यांची भेट घेणार’
‘स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक महायुतीने एकत्र लढविण्याबाबत आरपीआयची तयारी आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची भेट घेणार आहे. पुण्यात पक्षाला १५ ते १६ जागा मिळणे अपेक्षित आहे.’ महापौरपदाचे आरक्षण अनुसूचित जातीसाठी सोडल्यास अडीच वर्षे महापौर पदासाठी मागणी या वेळी आठवले यांनी केली. आठवले यांनी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डाॅ. बाबा आढाव यांची भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली.