पुणे : वारजे भागातून एका जोगत्याचे अपहरण करून त्याचा ताम्हिणी घाटात गोळ्या झाडून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. खुनामागचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. वारजे पोलिसांनी खून प्रकरणात दोघांना संशयावरून ताब्यात घेतले आहे.

गजानन हवा (वय ३८, रा. वारजे) असे खून झालेल्याचे नाव आहे. गजानन हवा जोगते होते. दोन दिवसांपूर्वी ते बेपत्ता झाले. त्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी ते बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांकडे दिली. त्यांचा मोबाइल क्रमांकही बंद असल्याने पोलिसांना ठावठिकाणा समजण्यात अडथळे येत होते. ते बुधवारी बेपत्ता झाले होते. त्या दिवशी दोघे जण त्यांच्या बरोबर असल्याची माहिती पोलिसांना समजली. त्यानंतर पोलिसांनी दोघांची चौकशी केली.

हेही वाचा : तीन खुनांच्या घटनांनी औरंगाबाद हादरले; भरदिवसा महाविद्यालयीन तरुणीची एकतर्फी प्रेमातून हत्या

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चौकशीत मिळालेल्या माहितीनुसार, वारजे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर खटके, उपनिरीक्षक नरेन मुंढे आणि पथकाने ताम्हिणी घाटात शोध मोहीम राबविली. यात गजानन हवा यांचा मृतदेह ताम्हिणी घाटात सापडला. त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. खुनामागचे कारण अद्याप समजलेले नाही. प्राथमिक तपासात हवा यांचा खून आर्थिक वादातून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.