पुणे : अमली पदार्थ विक्री प्रकरणात जामिनावर कारागृहाबाहेर आलेल्या सराइताने पुन्हा गांजा विक्री सुरू केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सहकारनगर पोलिसांनी सराइताला अटक केली असून, त्याच्याकडून तीन लाख रुपये किंमतीचा दहा किलो गांजा जप्त करण्यात आला.
प्रसाद गणेश हारपुडे (वय २५, रा. शंकर महाराज वसाहत, धनकवडी, पुणे-सातारा रस्ता) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. हारपुडे याच्याविरुद्ध यापूर्वी अमली पदार्थ विक्री प्रकरणी गुन्हे दाखल झाले होते. या प्रकरणात तो कारागृहात होता. तो जामिनावर कारागृहाबाहेर आल्यावर पुन्हा गांजा विक्री सुरू केली होती.
पुणे-सातारा रस्त्यावरील मोरे वस्ती भागात सहकारनगर पोलिसांचे पथक गस्त घालत होते. त्या वेळी पोलीस हवालदार अमोल पवार आणि अभिजित वालगुडे यांनी हारपुडेला पाहिले. पोलिसांना पाहताच तो पसार होण्याच्या तयारीत होता. सापळा लावून पोलिसांनी त्याला पकडले. त्याच्याकडे असलेल्या पिशवीची झडती घेण्यात आली. तेव्हा पिशवीत दहा किलो १३८ ग्रॅम गांजा सापडला. हारपुडेकडून जप्त करण्यात आलेल्या गांजाची किंमत तीन लाख रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते, सहायक आयुक्त राहुल आवारी यांच्या मार्गदर्शनाखाली सहकारनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल पवार, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुरेखा चव्हाण, सहायक निरीक्षक सागर पाटील, उपनिरीक्षक सद्दाम हुसेन फकीर, सहायक फौजदार बापू खुटवड, अमोल पवार, अभिजित वालगुडे, बजरंग पवार, सागर सुतकर, निखील राजवाडे, किरण कांबळे, संजय म्हस्के, अशोक ढावरे, अमित पद्मनाळे, महेश भगत, सत्यवान बाठे, रवी कदम यांनी ही कामगिरी केली.