वडगाव शेरीमध्ये गुन्हे शाखेच्या कारवाईत महिलेसह दोघे अटकेत
नगर रस्त्यावरील वडगाव शेरी भागात वेश्या व्यवसायासाठी कॉल सेंटर चालविण्यात येत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाकडून शुक्रवारी कॉल सेंटरवर छापा टाकण्यात आला. या कारवाईत महिलेसह दोघांना अटक करण्यात आली आहे.
या प्रकरणी श्रीकांत कालिदास तुळजापुरे (वय २७, रा. किणी, ता. अक्कलकोट, जि. सोलापूर), सागर स्वामिनाथ अंबाडे (वय २४), संतोषनी कैलासचंद्र साहू (वय २६, रा. महादेवनगर, वडगाव शेरी) यांना अटक करण्यात आली आहे. त्यांचे साथीदार अजय श्रीशैल्य हिरेमठ, दलाल गणेश आणि प्रताप यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वडगाव शेरी भागातील महादेवनगर येथे एका इमारतीत वेश्या व्यवसायाशी संबंधित कॉल सेंटर सुरू आहे. या कॉल सेंटरच्या माध्यमातून वेश्या व्यवसायाची माहिती तसेच व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून तरुणींची छायाचित्रे पुरवण्यात येत असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक शीतल भालेकर, सतीश ढोले यांना मिळाली. सामाजिक सुरक्षा विभागाने तेथे छापा टाकला. आरोपी अंबाडे, साहू, तुळजापुरे यांना ताब्यात घेण्यात आले. आरोपींकडून तेरा मोबाइल संच जप्त करण्यात आले आहे. वेश्या व्यवसायाशी संबंधित जाहिराती, दलालांचे मोबाइल क्रमांक संकेतस्थळावर टाकण्यात आले आहेत. महिला आरोपी साहूकडे बनावट आधार कार्ड सापडले आहे. आरोपींविरुद्ध माहिती-तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपायुक्त पंकज डहाणे, सहायक आयुक्त संजय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पाटील, चंदननगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र मुळीक, सहायक निरीक्षक भालेकर, चंद्रकांत जाधव, नितीन तेलंगे, रेवणसिद्ध नरोटे, सचिन शिंदे, प्रदीप शेलार, नितीन तरटे यांनी ही कारवाई केली.