लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे: तरुणाचा मोबाइल संच हिसकावून पसार झालेल्या चोरट्याला पोलिसांनी पाठलाग करुन पकडले. मुंढवा परिसरात ही घटना घडली. शशांक श्रीकांत नागवेकर (रा. केशवनगर, मुंढवा) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. या प्रकरणी नागवेकरचा साथीदार अस्मान बाबू शेख (रा. कोलवडी, ता. हवेली) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत शुभम आतिश जगताप याने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. जगताप कल्याणीनगर भागातील एका खासगी कंपनीत कामाला आहे. तो कंपनीतून घरी निघाला होता. जुन्या मुंढवा रस्त्यावर कॅफे बुद्धा समोर जगताप मोबाइलवर बोलत होता. त्या वेळी दुचाकीस्वार चोरटे नागवेकर आणि साथीदार शेखने जगताप याचा मोबाइल संच हिसकावला.
आणखी वाचा- लोणावळा: सिमेंट रस्ता खोदाईचा जाब विचारणाऱ्या ग्रामपंचायत सदस्याला मारहाण
जगतापने आरडाओरडा केला. त्या वेळी चंदननगर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी शिवा धांडे आणि नामदेव गडदरे तेथे गस्त घालत होते. धांडे आणि गडदरे यांनी पसार झालेल्या चोरट्यांचा पाठलाग सुरु केला. दुचाकीस्वार चोरटे साईनाथनगर परिसरात दुचाकी लावून नदीपात्रात पसार झाले. पोलीस कर्मचारी धांडे, गडदरे यांनी नागवेकरला पकडले. त्याचा साथीदार नदीपात्रातून पसार झाला असून त्याचा शोध घेण्यात येत आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे, गुन्हे शाखेचे निरीक्षक जगन्नाथ जानकर, उपनिरीक्षक गोरक्ष घोडके, अविनाश सकपाळ, महेश नाणेकर, शिवा धांडे, नामदेव गडदरे आदींनी ही कारवाई केली.