पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयात गेल्या काही दिवसांमध्ये गुन्हेगारी स्वरूपाच्या गंभीर घटना घडल्या त्याला पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयातील गुंडाविरोधी पथकासह युनिट एक, चार, दरोडा विरोधी पथक, भोसरी, चाकण, दिघी, वाकड पोलिसांनी योग्यरीत्या तोंड देऊन गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या. या सर्वांच्या पाठीवर कौतुकाची थाप पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी देत त्यांचा सन्मान केला आहे. गुंडाविरोधी पथकाने सलग दुसऱ्यांदा कौतुकाची थाप मिळवली आहे.

पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयाचा पदभार विनयकुमार चौबे यांनी स्वीकारल्यापासून शहरातील गुन्हेगारी काही प्रमाणात आटोक्यात आली आहे. परंतु, गेल्या काही दिवसांमध्ये हत्या, खंडणी, हत्येचा प्रयत्न, हत्येचा कट अशा गंभीर घटना घडल्या ज्यामुळे पिंपरी- चिंचवड शहर हादरले होते. पोलिसांनी गुन्हेगारांना वेळीच बेड्या ठोकत इतर गुन्ह्यांना आळा घातला आहे. पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या संकल्पनेतून टास्कद्वारे स्पर्धा निर्माण करून गुणवत्ता वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. शहरात वावरणाऱ्या गुन्हेगारांना अटक करणे, पाहिजे आरोपींना अटक करणे, शस्त्रे जप्त करणे अशा टास्कमध्ये पहिला नंबर मिळवणाऱ्या टीमचे कौतुक पोलीस आयुक्त करतात त्यांना कौतुकाची थाप दिली जाते.

आणखी वाचा-अजित पवारांच्या बालेकिल्ल्यात ‘शरद पवार’ आणि ‘अजित पवार’ अशी दोन पक्ष कार्यालये!

गंभीर गुन्ह्यातील आरोपींना गुंडा विरोधी पथकाने अटक करत टोळ्यातील गुन्हेगारांच्या मुसक्या आवळत गुंडाविरोधी पथक, दरोडा विरोधी पथक, गुन्हे शाखा युनिट एक, चार यांचा सन्मान करण्यात आला तर पोलीस ठाणे स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या भोसरी, चाकण, दिघी, वाकड पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांच्या पाठीवरही पोलीस आयुक्तांनी कौतुकाची थाप दिली आहे.