पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांची माहिती
कोपर्डीतील घडनेमध्ये पीडित कुटुंब व ग्रामस्थांशी चर्चा करून तेथील वातावरण चांगले करण्याची जबाबदारी माझ्यावर होती. ती आपण पूर्ण केली असून, या प्रकरणाचा तपास माझ्याकडे नाही, अशी माहिती पुण्याच्या पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना दिली.
नगर जिह्य़ातील कोपर्डी येथे अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिचा खून केल्याच्या प्रकरणाचे राज्यभर तीव्र पडसाद उमटत आहेत. या प्रकरणी चौकशी करण्याच्या दृष्टीने शुक्ला यांची मुख्यमंत्र्यांनी नियुक्ती केली होती. त्यानुसार शुक्ला यांनी कोपर्डीला भेट दिली व तेथील नागरिकांशी चर्चा केली. याबाबत शुक्ला यांनी सांगितले, की घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी व अमानुष आहे. घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी तेथील नागरिकांनी केली आहे. या प्रकरणी तीस दिवसांत आरोपपत्र दाखल करून अॅड. उज्ज्वल निकम यांना हा खटला चालविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कोपर्डीमध्ये ग्रामस्थांशी चर्चा केली. त्याचप्रमाणे तेथील शाळेत जाऊन विद्यार्थिनींशीही संवाद साधला. कोणतीही घटना दडवून ठेवू नका, कुणी त्रास देत असेल, तर त्याची माहिती तातडीने घरातील लोकांना द्या, असे विद्यार्थिनींना सांगितले. या घटनेचा तपास मी करणार नाही. तेथील पोलीस अधीक्षकांकडूनच त्याचा तपास सुरू आहे. गावातील वातावरण चांगले ठेवण्याची जबाबदारी माझ्यावर होती. त्यानुसार मी काम केले. ग्रामस्थांना माझा व तेथील पोलीस अधिकाऱ्यांचे मोबाइल क्रमांकही दिले आहेत.