पुणे शहरातील पर्वती येथील कॅनॉलमध्ये रात्री साडे अकराच्या सुमारास एका तरुणीने उडी मारल्याची घटना घडली.त्यावेळी पेट्रोलिंगवर असलेले कॉन्स्टेबल किरण पवार यांनी स्वतःच्या जीवाची परवा न करता,कॅनॉलमध्ये उडी मारून तिचा जीव वाचवला,यामुळे किरण पवार यांचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

या घटनेबाबत पर्वती पोलीस स्टेशनचे कॉन्स्टेबल किरण पवार यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले,आम्ही काल रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास सावरकर चौक येथून पेट्रोलिंग करीत जात होतो. त्यावेळी एक तरुणी कॅनॉलच्या जाळीच्या आतील बाजूने जात असताना दिसून आली.त्यावेळी मी आणि माझे सहकारी उन्हाळे यांनी विचारले काय झाले आहे.त्यावर ती तरुणी म्हणाली,तुम्ही माझ्याकडे येऊ नका,असे म्हणत तिने कॅनॉलमध्ये उडी मारली.

रात्रीचे साडे अकरा वाजले होते आणि त्या घटनास्थळी लाईट नाही.त्यामुळे त्या तरुणीला कसे वाचवायचे असा प्रश्न निर्माण झाला.त्यावेळी मी कसलाही विचार न करता,कॅनॉलमध्ये उडी मारली.त्या कॅनॉलमध्ये काही भागातून पाणी वाहत होते.तर काही ठिकाणी गाळ होता.त्यामुळे आम्ही दोघेही गाळामध्ये अडकण्याची शक्यता होती.पण तिला खूप प्रयत्न करून १० मिनिटात बाहेर काढले. त्या तरुणीच्या नाका तोंडात पाणी गेल्याने ती बेशुद्ध झाली.त्यावर तिला तात्काळ जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.