पिंपरी : तळवडे रेडझोनमधील अनधिकृत ‘स्पार्कल’ मेणबत्ती (कँडल) तयार करणाऱ्या कंपनीतील स्फोटात सहा महिला कामगारांचा होरपळून मृत्यू झालेल्या दुर्घटनेप्रकरणी कंपनी, जागा मालकासह चौघांविरोधात रात्री उशिरा देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिवराज एंटरप्रायजेस कंपनीचे मालक शुभांगी शरद सुतार (वय ३५), शरद सुतार (वय ४०, दोघे रा.पिंपरी सांडस, अशातपुरा फाटा, हवेली, पुणे) जागा मालक जन्नत नजीर शिकलगार, नजीर अमिर शिकलगार ( वय ७१, दोघे रा.मोहननगर, चिंचवड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी महापालिकेचे उप अग्निशमन अधिकारी बाळासाहेब विश्वनाथ वैद्य (वय ३८) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
हेही वाचा >>> तळवडे येथील अग्निकांडस जबाबदार अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा- शरद पवार गटाची मागणी
या दुर्घटनेत संगीता देवेंद्र आबदार (वय २८, रा.चिखली), पुनम अभय मिश्रा (वय ३६, रा.रुपीनगर, तळवडे), लता भारत दंगेकर (वय ४०, रा.रूपीनगर), मंगल बाबासाहेब खरबडे (वय ४५, रा.सहदेवनगर, तळवडे),कमलादेवी सुरज प्रजापती (वय ६१, परंडवाल चौक, देहूगाव ) आणि राधा सयाजी गोधडे (वय १८, तळवडे) या सहा महिलांचा जागीच होरपळून मृत्यू झाला आहे. तर, कंपनी मालक शरद सुतार (वय ४०) याच्यासह उषा सीताराम पाडवी (वय ४०),कविता गणेश राठोड (वय ३५),रेणुका मारूती राठोड (वय २०),कमल गणेश चौरे (वय ३५), प्रियंका अमोल यादव (वय ३२), अपेक्षा अमोल तोरणे (वय १८), शिल्पा राठोड (वय ३१), सुमन गोंधडे आणि प्रतीक्षा तोरणे (वय १६) अशा १० जणांवर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यापैकी शिल्पा, प्रतीक्षा, अपेक्षा आणि उषा या चार महिलांची प्रकृती चिंताजनक आहे. आरोपी शुभांगी आणि शरद सुतार यांची केकवरील ‘स्पार्कल’ मेणबत्ती बनविण्याची कंपनी आहे. आरोपी जन्नत शिकलगार, नजीर शिकलगार यांच्या जागेत ही कंपनी आहे. आरोपी सुतार यांनी स्पार्कल’ मेणबत्ती बनविण्यासाठी बेकायदेशीर व विनापरवाना स्फोटक व ज्वालागृही पदार्थांचा वापर केला. कंपनीतील कामगारांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कोणत्याही उपाययोजना केल्या नाहीत. आग विझविण्यासाठी कोणतीही उपाययोजना केली नाही. त्यामुळे कामगारांच्या जीवितास धोका होऊन त्यांचा मृत्यु होऊ शकतो, याची जाणीव असतानाही शिवराज एंटरप्रायजेस कंपनी बेकायदेशीर विनापरवाना चालू ठेऊन सहा कामगारांच्या मृत्यूस कारणीभूत झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.